राजकीय

अजितदादांच्या निधनानंतर बारामतीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट?; रोहित पवारांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट

विशेषतः शाळा आणि कॉलेज परिसरात नशेच्या पदार्थांची विक्री होत

अजितदादांच्या निधनानंतर बारामतीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट?; रोहित पवारांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट

विशेषतः शाळा आणि कॉलेज परिसरात नशेच्या पदार्थांची विक्री होत

बारामती वार्तापत्र 

बारामती शहर आणि तालुक्यात अवैध व्यवसायांमध्ये वाढ होत असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. मटका, जुगार, अवैध दारू विक्री यासोबतच आता गांजा आणि ड्रग्ससारख्या गंभीर प्रकारांचीही भर पडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेषतः युवा पिढी या विळख्यात अडकत असल्याचा आरोप सामाजिक स्तरावरून केला जात आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीतील कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम झाल्याची भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.

पूर्वी अवैध धंद्यांवर कठोर कारवाई होत असल्याचे सांगितले जात असताना, आता मात्र अनेक ठिकाणी खुलेआम प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे. शहरातील काही शाळांच्या परिसरात, नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाखाली तसेच रिंगरोड परिसरात गांजा व इतर नशेच्या पदार्थांची विक्री होत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बारामती परिसरात मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा जप्त करण्यात आला होता. हजारो किलो गांजा पकडण्यात आल्याची घटना राज्यभर चर्चेत आली होती. मात्र, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि संबंधित आरोपी अद्याप पूर्णपणे समोर आले नसल्याने नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

“इतका मोठा साठा सापडतो, पण त्यामागील मुख्य आरोपी मात्र सापडत नाहीत,” अशी चर्चा शहरात सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. बारामतीतील वाढत्या अवैध कारवायांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.

युवकांना व्यसनांच्या गर्तेतून वाचवण्यासाठी कठोर कारवाईची गरज असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
नागरिकांमधून पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. “अवैध धंदे उघडपणे सुरू असताना कारवाई का होत नाही?” असा सवाल विचारला जात आहे. काही सामाजिक संघटनांनी देखील या प्रकरणी कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे.

बारामतीसारख्या शिक्षण आणि विकासासाठी ओळखल्या जाणाऱ्या शहरात अशा प्रकारच्या घटना वाढत असल्याने पालक वर्गामध्येही चिंता वाढली आहे. विशेषतः शाळा आणि कॉलेज परिसरात नशेच्या पदार्थांची विक्री होत असल्याच्या चर्चेमुळे युवकांच्या भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
याप्रकरणी पोलीस प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते आणि अवैध धंद्यांवर कितपत कठोर कारवाई होते, याकडे आता बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.

Back to top button