अखेर बहुचर्चित बारामती दूध संघाच्या चेअरमनपदाचा राजीनामा; नव्या नियुक्तीकडे सर्वांचे लक्ष
पुढील राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींना वेग

अखेर बहुचर्चित बारामती दूध संघाच्या चेअरमनपदाचा राजीनामा; नव्या नियुक्तीकडे सर्वांचे लक्ष
पुढील राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींना वेग
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या बारामती दूध संघाच्या राजकारणात अखेर मोठी घडामोड घडली आहे. बहुचर्चित चेअरमन पदाचा राजीनामा देण्यात आल्याची माहिती समोर आली असून, हा राजीनामा संघाच्या एमडींकडे सुपूर्त करण्यात आल्याचे तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी स्पष्ट केले आहे.
त्यामुळे आता दूध संघातील पुढील राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बारामती दूध संघाबाबत सोशल मीडियावर विविध चर्चा रंगत होत्या. संघातील निर्णयप्रक्रिया, पदाधिकारी बदल आणि अंतर्गत नाराजी यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पारंपरिक राजकीय शैलीला धक्का बसेल अशा काही घडामोडी घडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यामुळे दूध संघातील वातावरण चांगलेच तापले होते.
दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर संबंधित विषयावर पुनर्विचार करण्यात आला आणि अखेर चेअरमन पदाचा राजीनामा घेण्याचा निर्णय झाल्याचे बोलले जात आहे. हा निर्णय संघटनेतील आगामी राजकीय समतोल राखण्यासाठी तसेच नवीन नेतृत्वाला संधी देण्यासाठी घेतला गेल्याची चर्चा आहे.
तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत विशेष बैठक आयोजित केली जाणार असून त्यामध्ये नवीन सदस्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत. त्यामुळे आता दूध संघाच्या नेतृत्वात कोणाची वर्णी लागणार, कोणाला महत्त्वाची जबाबदारी मिळणार याकडे कार्यकर्ते आणि राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.
बारामती दूध संघ हा तालुक्यातील महत्त्वाचा सहकारी संस्थांपैकी एक मानला जातो. त्यामुळे येथे होणारे बदल केवळ संघापुरते मर्यादित राहत नाहीत, तर त्याचा परिणाम स्थानिक राजकारणावरही होत असतो. आगामी काळात नवीन नेतृत्व कोणत्या पद्धतीने कामकाज सांभाळणार आणि संघातील अंतर्गत नाराजी कमी होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






