आपला जिल्हा

सरकारी मेडिकल कॉलेज बारामतीत गंभीर हलगर्जीपणाचा आरोप; डायलिसिस रुग्णाच्या रक्तस्त्रावाकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार

“रुग्ण मरणाच्या दारात असताना देखील डॉक्टर आणि प्रशासन गंभीर नाही,”

सरकारी मेडिकल कॉलेज बारामतीत गंभीर हलगर्जीपणाचा आरोप; डायलिसिस रुग्णाच्या रक्तस्त्रावाकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार

“रुग्ण मरणाच्या दारात असताना देखील डॉक्टर आणि प्रशासन गंभीर नाही,”

बारामती वार्तापत्र 

बारामतीतील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये येथे उपचारासाठी दाखल असलेल्या एका गंभीर रुग्णाच्या उपचारात हलगर्जीपणा होत असल्याचा धक्कादायक आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. संबंधित रुग्ण हा जनरल वॉर्ड क्रमांक 60, सहावा मजला, बेड क्रमांक 15 वर उपचार घेत असून, काल झालेल्या डायलिसिसनंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, डायलिसिस प्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाच्या शरीरातून सतत रक्तस्त्राव होत असून, रात्रीपासून मोठ्या प्रमाणात रक्त वाहत आहे. ही बाब वारंवार संबंधित वॉर्डमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही योग्य वेळी उपचार मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

“हे डॉक्टर येतात, ते डॉक्टर येतात” असे सांगून वेळ घालवला जात असून प्रत्यक्षात रुग्णाकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची संतप्त प्रतिक्रिया नातेवाईकांनी व्यक्त केली.

सदर रुग्ण हा डायलिसिसवर असून त्याला हृदयविकार आणि मधुमेहाचाही त्रास असल्याने त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. एवढ्या गंभीर परिस्थितीतही काही तपासण्या बाहेरून करून आणण्यास सांगितल्याने नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असताना अत्यावश्यक तपासण्या बाहेरून करण्यास सांगितले जात असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

रात्रीपासून सुरू असलेल्या रक्तस्त्रावामुळे रुग्णाचे मोठ्या प्रमाणात रक्त वाया गेल्याचा दावा नातेवाईकांनी केला असून, “रुग्ण मरणाच्या दारात असताना देखील डॉक्टर आणि प्रशासन गंभीर नाही,” असा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकारामुळे रुग्णालयातील आपत्कालीन आरोग्यसेवेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, या घटनेची वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांची चौकशी करावी, तसेच रुग्णाला त्वरित योग्य उपचार मिळावेत, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. सरकारी रुग्णालयांमधील रुग्णसेवा आणि व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Back to top button