धनराज पिसाळ प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी एल्गार; मोरगाव-बारामती मार्गावर रास्ता रोको
गुन्हा दाखल होऊन सुमारे ४० दिवसांचा कालावधी उलटूनही संबंधित आरोपींना अटक नाही!

धनराज पिसाळ प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी एल्गार; मोरगाव-बारामती मार्गावर रास्ता रोको
गुन्हा दाखल होऊन सुमारे ४० दिवसांचा कालावधी उलटूनही संबंधित आरोपींना अटक नाही!
बारामती वार्तापत्र
धनराज जयवंत पिसाळ प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी माळवाडी, फोंडवाडा, कान्हाटी आणि जळगाव परिसरातील ग्रामस्थांनी फोंडवाडा पाटी येथे एकत्र येत मोरगाव-बारामती मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. आरोपींवर कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
धनराज जयवंत पिसाळ यांना मानसिक त्रास व छळ केल्याच्या आरोपावरून दूध संघाचे संचालक सतीश हरिश्चंद्र पिसाळ यांच्यासह अन्य आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रॉपर्टीच्या वादातून झालेल्या कथित त्रासामुळे धनराज पिसाळ यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीय व ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होऊन सुमारे ४० दिवसांचा कालावधी उलटूनही संबंधित आरोपींना अटक झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. आरोपींच्या अटकेसाठी कुटुंबीय आणि ग्रामस्थांकडून पोलिस प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला; मात्र अपेक्षित कारवाई न झाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान, धनराज पिसाळ यांच्या कुटुंबातील धनश्री जयवंत पिसाळ आणि आशा जयवंत पिसाळ यांच्या जीवितास आरोपींकडून धोका असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. त्यामुळे संबंधित कुटुंबाला तातडीने पोलिस संरक्षण देण्यात यावे, तसेच गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक करून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली.
फोंडवाडा पाटी येथे मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाल्याने मोरगाव-बारामती मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. पोलिस प्रशासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन कायदेशीर प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी तपास यंत्रणेची असून, आरोपींवरील आरोप न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध होणे बाकी आहे. आता पोलिस प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते आणि आरोपींच्या अटकेबाबत पुढील कारवाई कधी होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.






