स्थानिक

बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दोनशे रुग्णांवर ईसीटीपद्धतीने उपचार

मानसिक आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनी स्वतःहून निर्णय न घेता प्रथम मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दोनशे रुग्णांवर ईसीटीपद्धतीने उपचार

मानसिक आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनी स्वतःहून निर्णय न घेता प्रथम मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

बारामती वार्तापत्र

बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील मानसोपचार विभागामध्ये माहे जानेवारी २०२४ पासून ते जून २०२६ या कालावधीत इलेक्ट्रो कॉनव्हलसिव्ह थेरपीद्वारे (ईसीटी) दोनशे रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले आहेत, अशी माहिती उपअधिष्ठाता व प्राध्यापक व विभाग प्रमुख भूलशास्त्र डॉ. प्रज्ञा भालेराव यांनी दिली आहे.

ईसीटी ही तीव्र स्वरूपाच्या मानसिक आजारांवर प्रभावी ठरणारी उपचारपद्धती आहे. या आधुनिक मॉडिफाइड ईसीटीमध्ये रुग्णाला प्रथम अल्पकालिन भूल देण्यात येते. त्यामुळे उपचारादरम्यान कोणताही त्रास किंवा वेदना जाणवत नाहीत. या उपचारामुळे आत्महत्येची प्रवृत्ती, तीव्र नैराश्य, आक्रमक वर्तन यामध्ये त्वरित सुधारणा होण्यास मदत होते.

स्किझोफ्रेनिया, बायपोलार डिसऑर्डर, तीव्र नैराश्य (डिप्रेशन), सायकोसिस यांसारख्या गंभीर मानसिक आजारांच्या उपचारामध्ये ईसीटीचा प्रभावी वापर केला जातो. अत्याधुनिक आणि सुरक्षित पद्धतीने दिल्या जाणाऱ्या या उपचारामुळे गंभीर मानसिक आजारांवरील उपचार अधिक परिणामकारक ठरत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले.

योग्य वैद्यकीय तपासणी, भूलतज्ज्ञांची उपस्थिती आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली दिली जाणारी उपचारपद्धती अत्यंत सुरक्षित आहे. मानसिक आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनी स्वतःहून निर्णय न घेता प्रथम मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.शासकीय दरामध्ये ईसीटीद्वारे उपचार होत असल्याने परिसरातील रुग्णांना या थेरपीचा लाभ होत असून रुग्णांसाठी वरदान ठरत आहेत.

त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित सर्वोपचार रुग्णालयात येथे उपचार घेवून मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. भालेराव यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

Back to top button