क्राईम रिपोर्ट

बारामतीत खुनाचा प्रयत्न? पतीने सांगितली धक्कादायक कहाणी; गुंगीचे औषध अन् पुरण्याचा आरोप

‘माझी दोन मुले कुठे आहेत?’; प्रविण जगताप यांची सुरक्षिततेची मागणी

बारामतीत खुनाचा प्रयत्न? पतीने सांगितली धक्कादायक कहाणी; गुंगीचे औषध अन् पुरण्याचा आरोप

‘माझी दोन मुले कुठे आहेत?’; प्रविण जगताप यांची सुरक्षिततेची मागणी

बारामती वार्तापत्र 

बारामतीतील जामदार रोड परिसरात पतीला ज्यूसमधून झोपेच्या गोळ्या देऊन बेशुद्ध केल्यानंतर मारहाण करून बांधकामाच्या कट्ट्यात टाकल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात आरोपी पत्नीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे.

जखमी पती प्रविण प्रकाश जगताप (वय ४१) यांच्या म्हणण्यानुसार, पत्नीने ज्यूसमधून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर अन्य एका व्यक्तीच्या मदतीने बॅटने मारहाण करून आपल्याला कट्ट्यात टाकण्यात आल्याचा त्यांनी आरोप केला आहे. घटनास्थळी काम करणाऱ्या गवंड्याच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर मदत मिळाली आणि त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने आपला जीव वाचल्याचा दावा जगताप यांनी केला.

कॅलेंडरवरील ‘No Result’ नोंदी चर्चेत

या प्रकरणाच्या तपासादरम्यान घरातील दोन कॅलेंडरवर वेगवेगळ्या तारखांसमोर ‘No Result’ अशी नोंद आढळल्याचा दावा जगताप यांनी केला आहे. या दोन्ही तारखा अमावास्येच्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

मात्र, या नोंदींचा घटनेशी संबंध असल्याचा कोणताही अधिकृत पुरावा अद्याप समोर आलेला नाही. ‘No Result’ या नोंदींचा नेमका अर्थ, त्या कोणी व कोणत्या कारणासाठी लिहिल्या, याचा संदर्भ पोलिसांच्या तपासातूनच स्पष्ट होणार आहे.

मेडिकल दुकानदाराच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी

आपल्याला झोपेच्या गोळ्या देण्यात आल्याचा आरोप करताना जगताप यांनी संबंधित औषधे कोठून आणि कोणत्या पद्धतीने मिळवण्यात आली, त्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन होते का, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. औषध विक्रीमध्ये नियमभंग आढळल्यास संबंधित मेडिकल दुकानदारावरही कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दोन मुलांच्या सुरक्षिततेचीही चिंता

जगताप यांनी आपली दोन मुले सासरच्या मंडळींकडे असल्याचा दावा केला असून, त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करून मुलांचा शोध घ्यावा व त्यांना आपल्याकडे देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणात वैद्यकीय अहवाल, घटनास्थळावरील पुरावे, मोबाईल व इलेक्ट्रॉनिक माहिती, औषधांची खरेदी-विक्री, संबंधित व्यक्तींचे जबाब आणि कॅलेंडरवरील नोंदी यांची तपासणी महत्त्वाची ठरणार आहे. या सर्व तपासातूनच घटनेमागील नेमके सत्य आणि कारण स्पष्ट होणार आहे.

टीप : या प्रकरणातील आरोप हे संबंधित व्यक्तीने केलेले दावे असून, त्यांची सत्यता पोलिसांच्या तपासानंतर व न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट होईल.

Back to top button