बारामती तालुक्यातील माळेगाव पोलिसांनी धाडसी कारवा;दोन गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुसे जप्त
एकूण १ लाख ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

बारामती तालुक्यातील माळेगाव पोलिसांनी धाडसी कारवा;दोन गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुसे जप्त
एकूण १ लाख ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
बारामती वार्तापत्र
राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. माळेगाव पोलिसांनी धाडसी कारवाई करत अक्षय कल्याण तावरे (वय ३५, रा.सांगवी, ता. बारामती, जि. पुणे) याला विनापरवाना बेकायदेशीर शस्त्रसाठ्यासह ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून दोन गावठी बनावटीची पिस्तुले, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे व दोन वापरलेल्या काडतुसांच्या पुंगळ्यांसह एकूण १ लाख ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर शंकर मोरे यांच्या फिर्यादीवरून माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५४/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३(३५), ५(२५) व २७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जून रोजी दुपारी सुमारे ४.१० वाजता सांगवी येथील कार्तिक हॉटेलसमोर संशयित हालचाली करत असताना अक्षय तावरे याची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडे कोणताही वैध परवाना नसताना दोन गावठी पिस्तुले, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे व दोन वापरलेल्या काडतुसांच्या पुंगळ्या आढळून आल्या. त्यानंतर संपूर्ण शस्त्रसाठा जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, अक्षय कल्याण तावरे याच्याविरुद्ध यापूर्वी वडगाव निंबाळकर, फलटण ग्रामीण, जेजुरी, दौंड, इंदापूर, खंडाळा (सातारा) आणि राजगड पोलीस ठाण्यांमध्ये दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी यांसारख्या गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार असल्याची नोंद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार भोर करीत असून, कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.






