बारामती तालुक्यातील सोनगावात हातभट्टीवर पोलिसांचा धडाका; ६०० लिटर रसायन नष्ट, तिघांवर गुन्हे
अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात मोहीम अधिक तीव्र

बारामती तालुक्यातील सोनगावात हातभट्टीवर पोलिसांचा धडाका; ६०० लिटर रसायन नष्ट, तिघांवर गुन्हे
अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात मोहीम अधिक तीव्र
बारामती वार्तापत्र
बारामती तालुका पोलिसांनी अवैध हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात धडक मोहीम राबवत सोनगाव परिसरात मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल ६०० लिटर हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे रसायन जप्त करण्यात आले असून तीन जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुप्त बातमीदारामार्फत सोनगाव (ता. बारामती) येथे अवैध दारू निर्मिती सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार १५ जून रोजी दुपारी पोलिसांनी छापेमारी केली. यावेळी करिना अनिकेत भोसले यांच्या घरामागील अड्ड्यावर छापा टाकला असता सुमारे २० हजार रुपये किमतीचे २०० लिटर हातभट्टी दारू तयार करण्यासाठीचे रसायन आढळून आले. याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८२/२०२६ दाखल करण्यात आला.
यानंतर संजीवनी मजनू भोसले यांच्या घराजवळील अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात सुमारे ४० हजार रुपये किमतीचे ४०० लिटर रसायन जप्त करण्यात आले. याप्रकरणी गुन्हा क्रमांक २८३/२०२६ नोंदविण्यात आला आहे.दरम्यान, १४ जून रोजी एमआयडीसी परिसरातील गोदरेज कंपनीजवळ देशी दारूची अवैध विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथेही कारवाई केली. नागेश प्रकाश चंदनशिवे (रा. दुर्गा टॉकीजजवळ, बारामती) याच्या ताब्यातून ५६० रुपये किमतीच्या ९० मिली क्षमतेच्या १४ सिलबंद देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
त्याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक २८१/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड आणि बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असून अशा बेकायदा धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे..






