राजकीय

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांची कमिशनिंग प्रक्रिया पूर्ण

एकूण ३० ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर करण्यात आला असून ३०,००० व्हीव्हीपॅट स्लिप्सची मोजणी करून ती कंट्रोल युनिटमधील निकालाशी जुळविण्यात आली.

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांची कमिशनिंग प्रक्रिया पूर्ण

एकूण ३० ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर करण्यात आला असून ३०,००० व्हीव्हीपॅट स्लिप्सची मोजणी करून ती कंट्रोल युनिटमधील निकालाशी जुळविण्यात आली.

बारामती वार्तापत्र 

निवडणुकीला उभे असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी निश्चित झाल्यानंतर तसेच ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांची दुसरी यादृच्छिक निवड (Second Randomization) पूर्ण झाल्यानंतर, मतदान केंद्रनिहाय ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांचे कमिशनिंग करण्यात येते.

यामध्ये राखीव ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांचाही समावेश असतो. ही प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर पार पाडली जाते. कमिशनिंग प्रक्रियेत बॅलेट युनिटवर बॅलेट पेपर बसविणे, कंट्रोल युनिटमध्ये उमेदवारांची नोंद करणे, तसेच व्हीव्हीपॅटमध्ये चिन्हे लोड करणे यांचा समावेश असतो.

ईव्हीएम व व्हीव्हीपॅट कमिशनिंग संदर्भातील सविस्तर सूचना ‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन मॅन्युअल’मध्ये देण्यात आलेल्या असून ते भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर https://www.eci.gov.in/evm-vvpat येथे उपलब्ध आहे. २०१ बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांचे कमिशनिंग दि. १७ एप्रिल २०२६ ते १८ एप्रिल २०२६ या कालावधीत महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदाम, एमआयडीसी, क्रमांक ४ बारामती येथे निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील रावडे यांच्या देखरेखीखाली करण्यात आले.

या प्रक्रियेचे निरीक्षण करण्यासाठी सर्व उमेदवारांना स्वतः उपस्थित राहण्याचे किंवा त्यांच्या प्रतिनिधींना नियुक्त करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार उमेदवार डॉ. विजयकुमार रामचंद्र भिसे हे कमिशनिंग प्रक्रियेसाठी उपस्थित होते. तसेच निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी यादृच्छिक पद्धतीने निवडलेल्या ५ टक्के ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांवर प्रत्येकी १००० मते टाकून ‘मॉक पोल’ घेण्यात आला.

या प्रक्रियेत एकूण ३० ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर करण्यात आला असून ३०,००० व्हीव्हीपॅट स्लिप्सची मोजणी करून ती कंट्रोल युनिटमधील निकालाशी जुळविण्यात आली. कमिशनिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रे भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या सुरक्षा व साठवण प्रोटोकॉलनुसार स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत.

मतदान साहित्य वितरणाच्या दिवशी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत आणि व्हिडिओ चित्रिकरणासह स्ट्राँग रूम उघडणे व बंद करणे ही प्रक्रिया पार पडणार आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली.

Back to top button