स्थानिक

बारामतीत कचरा संकलनाच्या ट्रॅक्टरमधून लोखंडी गज चोरीचा प्रयत्न; सीसीटीव्हीमध्ये घटना कैद, इंडिकेट कंपनीवर प्रश्नचिन्ह

नागरिकांमध्ये विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

बारामतीत कचरा संकलनाच्या ट्रॅक्टरमधून लोखंडी गज चोरीचा प्रयत्न; सीसीटीव्हीमध्ये घटना कैद, इंडिकेट कंपनीवर प्रश्नचिन्ह

नागरिकांमध्ये विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

बारामती वार्तापत्र 

शहरातील विश्वास नगर, गुणवडी रोड परिसरात कचरा संकलनासाठी येणाऱ्या ट्रॅक्टरमधून लोखंडी गज चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून कचरा संकलनाचे काम पाहणाऱ्या इंडिकेट कंपनीच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती नगर परिषद हद्दीत कचरा संकलनाचे काम इंडिकेट कंपनीमार्फत केले जाते. कंपनीचे ट्रॅक्टर आणि कर्मचारी दररोज विविध भागांत जाऊन घरगुती कचरा गोळा करतात. विश्वास नगर, गुणवडी रोड परिसरातही नियमितपणे कचरा संकलनासाठी ट्रॅक्टर येत असतो.

घटनेच्या दिवशी काही महिला कामगार परिसरातील घरांमधून कचरा गोळा करून ट्रॅक्टरमध्ये टाकत होत्या. त्याचवेळी शेजारील एका बांधकाम सुरू असलेल्या बंगल्याजवळ ठेवलेला लोखंडी गज ट्रॅक्टरमध्ये टाकून नेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे.

दरम्यान, संबंधित घरमालकाने हा प्रकार प्रत्यक्ष पाहिल्याने मोठा अनर्थ टळला. त्यांनी कामगारांना याबाबत जाब विचारला असता संबंधितांनी चूक झाल्याचे मान्य करत माफी मागितल्याची माहिती समोर आली आहे.

या परिसरात स्थानिक नगरसेवकांचा प्रभाग असून तेथे एका विद्यमान नगरसेवकांचे निवासस्थानही आहे. त्यामुळे इतक्या संवेदनशील परिसरात असा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरातील कचरा संकलनासाठी नियुक्त केलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून अशा प्रकारचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर शहरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांवर आणि इंडिकेट कंपनीवर प्रशासन कोणती कारवाई करणार, याकडे आता बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.

Back to top button