स्थानिक

किन्नर समाजात जातीय तेढ निर्माण केल्याचा आरोप; बिपाशा उर्फ आकाश राजू माणिकम यांच्यावर कारवाईची मागणी

विधानांमुळे किन्नर समाजामध्ये संभ्रम आणि अस्वस्थता निर्माण झाली

किन्नर समाजात जातीय तेढ निर्माण केल्याचा आरोप; बिपाशा उर्फ आकाश राजू माणिकम यांच्यावर कारवाईची मागणी

विधानांमुळे किन्नर समाजामध्ये संभ्रम आणि अस्वस्थता निर्माण झाली

बारामती वार्तापत्र 

किन्नर समाज हा परंपरेने एकोप्याने, शांततेत आणि परस्पर सहकार्याच्या भावनेत राहणारा समाज म्हणून ओळखला जातो. मात्र अलीकडच्या काळात काही व्यक्तींमुळे समाजामध्ये अनावश्यक वाद निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पुणे येथील किन्नर बिपाशा उर्फ आकाश राजू माणिकम या व्यक्तीकडून विविध ठिकाणी भडकावू वक्तव्ये करून किन्नर समाजामध्ये जातीय भावना भडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप समाजातील प्रतिनिधींनी केला आहे.

यासंदर्भात समाजातील काही सदस्यांनी सांगितले की, बिपाशा उर्फ आकाश माणिकम यांनी पंढरपूर येथील किन्नर वैष्णवी वसंत वाघमारे यांच्या संदर्भातही वाद निर्माण करणारी विधाने केली. या विधानांमुळे किन्नर समाजामध्ये संभ्रम आणि अस्वस्थता निर्माण झाली असून समाजात अनावश्यक तणावाचे वातावरण तयार होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

किन्नर समाजातील विविध घटक—तृतीयपंथी, जोगती, आराधी तसेच इतर समाजबांधव—यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणाऱ्या अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे शांतता भंग होण्याची शक्यता असल्याने संबंधित व्यक्तीवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या मागणीसंदर्भात समाजाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच बारामती शहर व तालुका पोलीस ठाणे येथे लेखी निवेदन देण्यात आले आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही निवेदनामध्ये करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रशासनाने या निवेदनाची दखल घेत संबंधित प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती समाजाच्या प्रतिनिधींनी दिली.

Back to top button