बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई; घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड
एकूण १ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई; घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड
एकूण १ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
बारामती वार्तापत्र
वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकूण १ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये तीन मोटारसायकलींचा समावेश असून एक घरफोडीचा गुन्हाही उघडकीस आला आहे.
या प्रकरणाची सुरुवात मौजे कोन्हाळे बु. (ता. बारामती, जि. पुणे) येथील कठीण पुल परिसरातून लाल रंगाची एमएच ४२ एपी ९४९६ क्रमांकाची मोटारसायकल चोरीला गेल्याच्या तक्रारीपासून झाली. या संदर्भात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५२/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत नोंद करण्यात आली होती.
तपासादरम्यान पोलिसांनी पेट्रोलिंग करत असताना नंबर प्लेट नसलेल्या मोटारसायकलवर संशयास्पदरीत्या फिरणारा एक इसम ताब्यात घेतला. चौकशीत त्याने आपला मित्र मयूर नितीन भोसले (रा. कालठण नं. १, ता. इंदापूर, जि. पुणे) आणि आणखी दोन अनोळखी साथीदारांसह विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपींनी कोन्हाळे बु. येथील कठीण पुल परिसरातून एक होंडा युनिकॉर्न, फलटण ग्रामीण (जि. सातारा) येथून आणखी एक होंडा युनिकॉर्न आणि लोणंद (जि. सातारा) येथून हिरो स्प्लेंडर मोटारसायकल चोरी केल्याचे उघड झाले. या तिन्ही मोटारसायकली कोन्हाळे खुर्द-होळ रोडलगत पुलाजवळील झुडपात लपवून ठेवण्यात आल्या होत्या. पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्या आहेत.
याशिवाय, आरोपींनी वडगाव परिसरातील होळ येथे बंद घर फोडून चोरी केल्याचेही कबूल केले आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर, फलटण ग्रामीण आणि लोणंद पोलीस ठाण्यांमध्ये एकूण चार गुन्हे नोंद आहेत. संबंधित गुन्ह्यांमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.
या सर्व गुन्ह्यांमधील एकूण १,६५,५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पुढील तपास सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्यासह
कुलदीप संकपाळ,बाळासाहेब कारंडे,अभिजीत एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार पोपट नाळे, भाउसाो मारकड, सागर चौधरी, महेश पन्हाळे, आबा जाधव, सुरज धोत्रे, धनंजय भोसले, नरेद्र यादव यांनी केलेली आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास चालु आहे.स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस पथकातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी केली.






