बारामतीतील शासकीय मेडिकल कॉलेजचा ढिसाळ कारभार किसन मत्रे यांचा उपचाराअभावी मृत्यू
एवढ्या हालचाली आणि पाठपुराव्यानंतरही रुग्णाला वेळेत आवश्यक डायलिसिस मिळाले नाही

बारामतीतील शासकीय मेडिकल कॉलेजचा ढिसाळ कारभार किसन मत्रे यांचा उपचाराअभावी मृत्यू
एवढ्या हालचाली आणि पाठपुराव्यानंतरही रुग्णाला वेळेत आवश्यक डायलिसिस मिळाले नाही
बारामती वार्तापत्र
बारामतीत आज घडलेल्या किसन गोपाळराव मत्रे यांच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण शहर हादरले असून शासकीय आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. उपचारासाठी आशेने दाखल झालेल्या एका वृद्ध रुग्णाला वेळेत योग्य वैद्यकीय सुविधा न मिळाल्याचा आरोप होत असून, या घटनेमुळे बारामतीकरांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
७० वर्षीय किसन मत्रे यांना काही दिवसांपूर्वी अचानक किडनीचा गंभीर आजार उद्भवला होता. प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना अकलूज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे सलग पाच दिवस उपचार आणि डायलिसिस झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. डॉक्टरांनी पुढील काळात नियमित डायलिसिसची गरज असल्याचे सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना बारामती येथे हलवण्याचा निर्णय घेतला. बारामतीत उभारण्यात आलेले शासकीय मेडिकल कॉलेज सर्वसामान्यांसाठी आधार ठरेल, या विश्वासातूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे नातेवाईक सांगत आहेत.
या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली होती. या मदतीसाठी सुनेत्रा पवार यांनी स्वतः लक्ष घातल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर त्यांचे PA सचिन यादव, युगेंद्र पवार तसेच सचिन सातव यांनीही रुग्णाच्या उपचारासाठी प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्याचे सांगितले जात आहे. शर्मिला पवार यांनी स्वतः रुग्णालयात भेट देत रुग्णाची विचारपूस केली आणि प्रशासनाला योग्य उपचार करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
मात्र, एवढ्या हालचाली आणि पाठपुराव्यानंतरही रुग्णाला वेळेत आवश्यक डायलिसिस मिळाले नाही, असा गंभीर आरोप कुटुंबीय आणि नागरिकांकडून केला जात आहे. वेळेवर उपचार मिळाले असते तर किसन मत्रे यांचा जीव वाचू शकला असता, अशी भावना व्यक्त होत आहे. या घटनेमुळे मेडिकल कॉलेजमधील प्रशासनाचा गलथान कारभार, रुग्णांविषयीची संवेदनाहीनता आणि व्यवस्थेतील निष्काळजीपणा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
बारामतीतील हे शासकीय मेडिकल कॉलेज उभारताना स्वर्गीय अजितदादा पवार यांनी गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या शहरात धावपळ न करता दर्जेदार उपचार मिळावेत, हे स्वप्न पाहिले होते. मात्र आज त्याच संस्थेबाबत लोकांच्या मनात नाराजी व्यक्त होत आहे. “जर मोठ्या नेत्यांचे फोन, सूचना आणि प्रत्यक्ष भेटी असूनही प्रशासन हलत नसेल, तर सामान्य माणसाने न्याय कुणाकडे मागायचा?” असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
किसन मत्रे यांच्या निधनानंतर बारामतीत आरोग्य व्यवस्थेबाबत अस्वस्थता वाढली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ही घटना केवळ एका कुटुंबाचे दुःख नसून, बारामतीतील प्रत्येक नागरिकाच्या मनात भीती निर्माण करणारी ठरत आहे. “आज किसन मत्रे गेले… उद्या कुणाचा नंबर?” हा प्रश्न आता सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे.






