क्राईम रिपोर्ट

अवैध दारूस प्रतिबंध समिती तात्काळ स्थापन करा ; मन्सूर शेख यांची मागणी

शासन निर्णयाची अंमलबजावणी करा;उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

अवैध दारूस प्रतिबंध समिती तात्काळ स्थापन करा ; मन्सूर शेख यांची मागणी

शासन निर्णयाची अंमलबजावणी करा;उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

बारामती वार्तापत्र

बारामती तालुक्यात अवैध दारू व्यवसायाविरोधात कठोर कारवाईची मागणी करत सामाजिक कार्यकर्ते मन्सूर कमाल शेख यांनी मा. उपविभागीय अधिकारी, बारामती यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे. महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या दिनांक ११ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार “अवैध दारूस प्रतिबंध घालण्यासाठी समिती” तात्काळ स्थापन करून प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शासन निर्णयानुसार उपविभागीय दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर समिती गठीत करून अवैध दारू निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच संबंधित गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मात्र बारामती तालुक्यात विविध भागांमध्ये हातभट्टी, अवैध दारू विक्री, बेकायदेशीर वाहतूक आणि सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.

या अवैध व्यवसायामुळे युवक वर्ग व्यसनाधीन होत असून महिला व सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अनेक वेळा स्थानिक नागरिकांनी तक्रारी करूनही प्रभावी कारवाई होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली असल्याचे मन्सूर शेख यांनी म्हटले आहे.

यावेळी त्यांनी प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये शासन निर्णयानुसार बारामती विभागात समिती तात्काळ कार्यान्वित करणे, नियमित बैठका घेऊन विशेष मोहीम राबविणे, पोलीस विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग व महसूल विभाग यांच्या संयुक्त कारवाया आयोजित करणे, अवैध दारू विक्री सुरू असलेल्या ठिकाणांवर कठोर कायदेशीर कारवाई करणे, नागरिकांसाठी हेल्पलाईन सुरू करणे तसेच शाळा, महाविद्यालये व सार्वजनिक परिसरात विशेष तपासणी मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच शासन निर्णयाची माहिती ग्रामपंचायत, नगरपरिषद आणि संबंधित शासकीय कार्यालयांना देऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

बारामती तालुक्यात वाढत चाललेल्या अवैध दारू व्यवसायामुळे सामाजिक वातावरण बिघडत असून युवकांचे भविष्य धोक्यात येत असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा अर्जदार मन्सूर कमाल शेख यांनी व्यक्त केली आहे.

Back to top button