आपला जिल्हा

गर्भलिंग, श्रीबीज प्रकरणांनी पुन्हा वाढवली चिंता; बारामती, दौंड, फलटण परिसरात बेकायदेशीर प्रकारांचा सुळसुळाट, कारवाई मात्र शून्य?

सहा दिवसांनी गुन्हा दाखल झाल्याने संशयाचे वातावरण; प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांचे प्रश्न

गर्भलिंग, श्रीबीज प्रकरणांनी पुन्हा वाढवली चिंता; बारामती, दौंड, फलटण परिसरात बेकायदेशीर प्रकारांचा सुळसुळाट, कारवाई मात्र शून्य?

सहा दिवसांनी गुन्हा दाखल झाल्याने संशयाचे वातावरण; प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांचे प्रश्न

बारामती वार्तापत्र

बारामती, दौंड आणि फलटण परिसरात अलिकडच्या काळात समोर आलेल्या गर्भलिंग निदान, श्रीबीज आणि अवैध गर्भपात प्रकरणांमुळे पुन्हा एकदा संपूर्ण परिसर हादरला आहे. एकामागून एक गंभीर प्रकार उघड होत असताना प्रशासन आणि पोलिसांची कारवाई मात्र अत्यंत संथ गतीने होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री यांच्या कार्यपद्धतीत पोलिस आणि प्रशासनावर असलेली मजबूत पकड आता कमी झाल्याचे चित्र दिसत असून, त्यामुळेच अशा बेकायदेशीर प्रकारांना खतपाणी मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

बारामतीमध्ये गाजलेल्या श्रीबीज प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू असतानाच तालुक्यातील वडगाव येथे गर्भलिंग निदानाशी संबंधित गुन्हा समोर आला. हे प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत फलटण परिसरातही अशाच स्वरूपाच्या चर्चांनी जोर धरला. त्यानंतर आता दौंड तालुक्यातील केडगाव येथे नव्याने बेकायदा गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरण समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केडगाव परिसरात अवैधरित्या गर्भलिंग निदान सुरू असल्याची माहिती अनेक दिवसांपासून स्थानिक पातळीवर चर्चेत होती. दि. १४ रोजी यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर प्रकरणाने मोठे स्वरूप घेतले. मात्र, एवढ्या गंभीर प्रकारानंतरही प्रत्यक्ष गुन्हा दाखल होण्यासाठी तब्बल सहा दिवस लागल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी उपजिल्हा रुग्णालय दौंड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन गुजर यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, केडगाव येथील अण्णासाहेब गिरी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड करत आहेत.

मात्र, “व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तत्काळ कारवाई का झाली नाही?”, “गुन्हा दाखल करण्यास एवढा विलंब कशामुळे झाला?”, “या मागे आणखी मोठे रॅकेट कार्यरत आहे का?” असे अनेक प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. गर्भलिंग निदानासारखा कायद्याने बंदी असलेला आणि अत्यंत संवेदनशील प्रकार समोर आल्यानंतरही प्रशासनाने तातडीने हालचाल न केल्याने यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, बारामती, दौंड आणि फलटण परिसरात अलिकडच्या काळात वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित संशयास्पद आणि बेकायदेशीर प्रकार सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलिस यांच्यात समन्वयाचा अभाव आहे का, अशीही चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, आर्थिक व्यवहार झाले का, तसेच इतर ठिकाणीही अशाच प्रकारे गर्भलिंग निदान केले जात होते का, याचा शोध घेतला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

या सर्व घटनांमुळे बारामतीसह संपूर्ण परिसरात कायदा आणि प्रशासनाचा धाक कमी होत चालल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली असून, संबंधित प्रकरणांमध्ये कठोर आणि तातडीची कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Back to top button