पुणे ग्रामीण आणि बारामती शहर पोलिसांची मोठी कारवाई;आंतरराज्यीय तस्करांकडून दोन कोटी ३९ लाखांचा गांजा जप्त
आंतरराज्यीय गांजा तस्करी करणारी टोळी पश्चिम महाराष्ट्रातील छोट्या गांजा विक्रेत्यांना गांजा विक्री करत असल्याची माहिती

पुणे ग्रामीण आणि बारामती शहर पोलिसांची मोठी कारवाई;आंतरराज्यीय तस्करांकडून दोन कोटी ३९ लाखांचा गांजा जप्त
आंतरराज्यीय गांजा तस्करी करणारी टोळी पश्चिम महाराष्ट्रातील छोट्या गांजा विक्रेत्यांना गांजा विक्री करत असल्याची माहिती
बारामती वार्तापत्र
आंतरराज्यीय गांजा तस्करांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, तसेच बारामती शहर पोलिसांनीअटक केली. या कारवाईत पोलिसांनी दोन कोटी ३९ लाख रुपयांचा ६३४ किलो गांजा जप्त केला.
या टोळीने पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यात गांजा विक्री केली आहे. आरोपींकडून गांजासह कार, तसेच अन्य वस्तू असा तीन कोटी तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
समाधान धर्मराज गायकवाड (वय २९), विकी ऊर्फ पप्पू कांबळे (वय ३२), प्रकाश ऊर्फ पक्या मोहन काटे (वय २९), प्रिन्सकुमार मुन्ना सिंग (वय २२) , राहुल कल्याण गोरे (वय २७), तसेच हुसेन सुखदेव लष्करे (वय ३५), आदित्य विकास शिंदे (वय २०), जॉकी माझी आणि युवराज ज्ञानेश्वर दुर्गे, अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
विकी कांबळे हा मुख्य सूत्रधार आहे. आरोपी जॉकी माझी हा मूळचा ओडिशाचा आहे. आरोपी प्रिन्स हा मूळचा बिहारचा आहे. आरोपी माझी याच्या मदतीने कांबळे आणि साथीदारांनी छत्तीसगडमधून गांजा आणला होता. पुणे जिल्हा, सोलापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात त्यांनी गांजा विक्री केली होती. बारामती परिसरात त्यांनी गांजा साठवून ठेवला होता.
आरोपी लष्करे, शिंदे, दुर्गे हे कोथरूड परिसरात राहायला आहेत. आंतरराज्यीय गांजा तस्करी करणारी टोळी पश्चिम महाराष्ट्रातील छोट्या गांजा विक्रेत्यांना गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर ग्रामीण पोलिसांची गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला’, अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी दिली.
आरोपी सिंग आणि कांबळे हे दोन कारमधून गांजा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. पंढरपूर-फलटण मार्गावर पोलिसांनी सापळा लावला. एक कार सांगलीकडे गेली. त्यानंतर याबाबतची माहिती सांगली पोलिसांच्या गुन्हे शाखेला देण्यात आली. पोलिसांनी सापळा लावून दोन कारला अडवत आरोपींना अटक केली.






