रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही’युगेंद्र पवार यांचा बारामतीत सरकारवर हल्लाबोल
महागाई, कांदा दर आणि वाढत्या गुन्हेगारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आक्रमक

रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही’युगेंद्र पवार यांचा बारामतीत सरकारवर हल्लाबोल
महागाई, कांदा दर आणि वाढत्या गुन्हेगारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आक्रमक
बारामती वार्तापत्र
वाढती महागाई, इंधन दरवाढ, कांद्याला मिळत असलेला भाव, वीजपुरवठ्याच्या समस्या, पाणीटंचाई आणि बारामतीतील वाढती गुन्हेगारी यांसह विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आक्रमक झाली असून बारामतीत निषेध आंदोलन करण्यात आले. युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली तीन हत्ती चौकात झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
जनतेच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने रस्त्यावर उतरण्याशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय उरलेला नाही,” असे युगेंद्र पवार यांनी सांगितले. महागाईविरोधात राज्यभर आंदोलन सुरू असल्याचे सांगत त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विशेष भर दिला. कांदा पिकवण्यासाठी एका एकराला सुमारे एक लाख रुपयांचा खर्च येत असताना बाजारात केवळ ७५० ते १००० रुपये प्रति टन दर मिळत असल्याचा दावा पवार यांनी केला.
बारामती तालुक्यात चार ते साडेचार हजार कांदा उत्पादक शेतकरी असून मोडवे, बाबुर्डी आणि परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बारामतीत तातडीने नाफेड खरेदी केंद्र सुरू करावे, कांदा उत्पादकांना किमान १५०० रुपये अनुदान द्यावे आणि कांद्याला ३००० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली.
डिझेल, पेट्रोल, खत आणि गॅसच्या वाढत्या किमतींमुळे शेतीचा खर्च वाढल्याचा आरोप करत पवार यांनी इंधन दरवाढीवर सरकारवर टीका केली. ग्रामीण भागात इंधन आणि गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत असल्याचा दावा करत गॅसचा काळाबाजार रोखण्याची मागणीही त्यांनी केली.
बारामती तालुक्यात गेल्या अडीच महिन्यांपासून सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू असलेले लोडशेडिंग तातडीने बंद करावे, अशी मागणी युगेंद्र पवार यांनी केली. तापमान वाढत असताना पाण्याचा पुरवठा कमी होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. तालुक्यात चारा टंचाईचा प्रश्न गंभीर बनल्याचे त्यांनी सांगितले.
बारामतीत गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोप करत पवार यांनी महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला. “पूर्वी दादांची बारामती म्हणून ओळख असलेल्या शहरात महिलांना सुरक्षित वाटत होते. आता अनेक महिला स्वतः येऊन वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त करत आहेत,” असे ते म्हणाले. अवैध दारू व्यवसाय, नियमबाह्य हातभट्ट्या आणि इतर गुन्हेगारी प्रकार वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांकडून गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा केला जात असला तरी त्याबाबत बारामतीच्या नागरिकांचे मत विचारावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
———–
सरकारला इशारा
शासनाला दिलेल्या निवेदनात महागाई नियंत्रणात आणणे, इंधन दर कमी करणे, शेतमालाला हमीभाव देणे, रोजगारनिर्मिती करणे आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. सरकारने मागण्यांची दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
————






