शैक्षणिक

लेझीमच्या तालावर विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत; श्री छत्रपती शाहू स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

नवीन पुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला.

लेझीमच्या तालावर विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत; श्री छत्रपती शाहू स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

नवीन पुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला.

बारामती वार्तापत्र 

नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभानिमित्त येथील श्री छत्रपती शाहू स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थी प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

विद्यालयात आगमन करणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे लेझीमच्या तालावर आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस संस्मरणीय ठरावा यासाठी विद्यालय प्रशासनाने विशेष नियोजन केले होते. लेझीमच्या गजरात विद्यार्थ्यांनी विद्यालयात प्रवेश करताच त्यांच्यात उत्साह संचारल्याचे चित्र पाहायला मिळाले.

यावेळी विद्यार्थ्यांना शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या नवीन पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांचा शालेय जीवनाचा प्रारंभ आनंददायी व्हावा यासाठी गोड खाऊचेही वाटप करण्यात आले. नवीन पुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष सदाशिव सातव होते. प्रमुख उपस्थितीत विद्यालयाचे प्राचार्य गणपत रामचंद्र तावरे यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांनी शिस्त, गुणवत्ता आणि परिश्रम यांच्या बळावर यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी ज्येष्ठ शिक्षक सुनील म्हस्के, उपप्राचार्य महादेव आगम, रंजीत गायकवाड, अतुल दिवेकर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी टेके यांनी केले, तर नितीन परदेशी यांनी आभार मानले. उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या प्रवेश उत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या नवीन शैक्षणिक वर्षाची आनंददायी सुरुवात झाली.

Back to top button