क्राईम रिपोर्ट

बारामतीतील चार्टर्ड अकाउंटंटविरुद्ध फसवणूक व जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा

“काय करायचे ते करा, कोर्टात जा, मी घाबरत नाही,”

बारामतीतील चार्टर्ड अकाउंटंटविरुद्ध फसवणूक व जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा

“काय करायचे ते करा, कोर्टात जा, मी घाबरत नाही,”

बारामती वार्तापत्र 

बारामती शहर पोलीस ठाण्यात एका चार्टर्ड अकाउंटंटविरुद्ध तब्बल 47 लाखांहून अधिक रुपयांच्या भागीदारी हिश्श्याची फसवणूक केल्याचा तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा नोंदविण्यात आला असून, या प्रकरणामुळे व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजीव शरदचंद्र कोठाडिया (वय 69, रा. पंढरपूर) यांनी बारामती येथील चार्टर्ड अकाउंटंट प्रतिक जीवन दोशी (वय 39) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी व आरोपी हे नातेवाईक असून त्यांनी भागीदारीतून ‘संजीव कोठाडिया व प्रतिक दोशी अँड कंपनी’ या नावाने चार्टर्ड अकाउंटंटची फर्म सुरू केली होती.तक्रारीनुसार, आरोपीने फर्म डीडचा वापर करून विविध व्यवहार केले.

यामध्ये फर्मची नोंदणी, आयसीएआय नोंदणी, कार्यालयासाठी जागा भाड्याने घेणे, बँक खाते उघडणे, जीएसटी व आयकर नोंदणी तसेच आर्थिक व्यवहारांचा समावेश होता. मात्र, फर्मच्या हिशोबानुसार फिर्यादींना मिळणारा 47 लाख 66 हजार 783 रुपये 91 पैसे इतका हिस्सा देण्यास आरोपीने नकार दिला.

फिर्यादींचा आरोप आहे की, फर्म नोंदणीकृत नसल्याचे कारण पुढे करत आरोपीने हिस्सा देण्यास टाळाटाळ केली. तसेच खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून विश्वासघात व फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, 15 एप्रिल 2025 रोजी दोन्ही पक्षांमध्ये तडजोडीबाबत चर्चा झाली असता आरोपीने स्पष्ट नकार दिला.

यावेळी “काय करायचे ते करा, कोर्टात जा, मी घाबरत नाही,” असे म्हणत फिर्यादींना धमकावल्याचा आरोप आहे. तसेच “अपघात दाखवून संपवीन, मी परवानाधारक शस्त्रधारक आहे, तुमचा गेम करीन,” अशा स्वरूपाची जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादींनी म्हटले आहे.

या प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, बारामती यांनी दिलेल्या आदेशानुसार बारामती शहर पोलिसांनी गुन्हा क्रमांक 237/2026 दाखल केला आहे. आरोपीविरुद्ध विश्वासघात, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, धमकी देणे आदी विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक राऊत करीत आहेत.

Back to top button