स्थानिक

बारामती तालुक्यातील पणदरे खिंडीत धावत्या सीएनजी बसला भीषण आग; प्रवाशांची थरारक सुटका, जीवितहानी टळली

काही क्षणांतच धुराचे रूपांतर आगीत झाले आणि आगीने रौद्ररूप धारण केले.

बारामती तालुक्यातील पणदरे खिंडीत धावत्या सीएनजी बसला भीषण आग; प्रवाशांची थरारक सुटका, जीवितहानी टळली

काही क्षणांतच धुराचे रूपांतर आगीत झाले आणि आगीने रौद्ररूप धारण केले.

बारामती वार्तापत्र

निरा-बारामती मार्गावरील पनदरे खिंडीत आज पहाटेच्या सुमारास धावत्या सीएनजी बसला अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली असून सुदैवाने चालक, वाहक आणि सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात यश आले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बस पनदरे खिंडीतून निराच्या दिशेने जात असताना अचानक वाहनातून धूर निघत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने प्रसंगावधान राखत बस तात्काळ रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यानंतर चालक आणि वाहक यांनी प्रवाशांना तत्काळ खाली उतरवण्यास सुरुवात केली.काही क्षणांतच धुराचे रूपांतर आगीत झाले आणि आगीने रौद्ररूप धारण केले.

बघता बघता संपूर्ण बस आगीच्या विळख्यात सापडली. आग इतकी भीषण होती की काही वेळातच बस जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणांनाही कळविण्यात आले.

या दुर्घटनेत बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून बसचा केवळ लोखंडी सांगाडा शिल्लक राहिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, सर्व प्रवाशांना वेळेत बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. संभाव्य जीवितहानी टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

दरम्यान, बसला आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सीएनजी यंत्रणेमध्ये बिघाड झाला होता की अन्य काही तांत्रिक कारणामुळे आग लागली, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू करण्यात आला आहे.

या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. पनदरे खिंडीतील या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सार्वजनिक वाहतुकीतील वाहनांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मात्र एक मोठी दुर्घटना टळल्याची भावना व्यक्त होत आहे.

Back to top button