दाट लोकवस्तीत भंगार दुकानाला भीषण आग; अवैध व्यवसायावर पुन्हा प्रश्नचिन्ह
पहाटेच्या सुमारास अचानक दुकानातून धूर

दाट लोकवस्तीत भंगार दुकानाला भीषण आग; अवैध व्यवसायावर पुन्हा प्रश्नचिन्ह
पहाटेच्या सुमारास अचानक दुकानातून धूर
वडगाव निंबाळकर;प्रतिनिधी
निरा-बारामती मार्गालगत भरलोक वस्तीत असलेल्या एका भंगार दुकानाला शुक्रवारी (दि. १९) पहाटे दोनच्या सुमारास भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत दुकानातील मोठ्या प्रमाणातील भंगार साहित्य पूर्णतः जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र दाट लोकवस्तीत सुरू असलेल्या कथित अवैध भंगार व्यवसायामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास अचानक दुकानातून धूर व आगीचे लोळ बाहेर पडू लागल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी तत्काळ आग विझविण्याचा प्रयत्न केला तसेच संबंधित यंत्रणांना माहिती दिली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने दुकानातील संपूर्ण भंगार साहित्य जळून खाक झाले.
घटनेच्या वेळी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दुकानाच्या आजूबाजूला घरे, व्यावसायिक आस्थापने आणि रहिवासी वस्ती असल्याने आग इतर ठिकाणी पसरली असती तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे आणि वेळेत केलेल्या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर संबंधित भंगार व्यवसायाच्या वैधतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दाट लोकवस्तीत अशा प्रकारचे भंगार साहित्य साठवणे धोकादायक असून आग लागण्याच्या घटना वारंवार घडण्याची शक्यता असते. अशा व्यवसायांसाठी आवश्यक परवानग्या, अग्निसुरक्षा उपाययोजना आणि प्रशासनाची तपासणी याबाबतही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने सर्व भंगार दुकाने आणि गोदामांची तपासणी करण्याची मागणी केली आहे. विशेषतः रहिवासी भागात सुरू असलेल्या अवैध किंवा नियमबाह्य व्यवसायांवर कठोर कारवाई करून नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. मात्र या घटनेने दाट लोकवस्तीत सुरू असलेल्या धोकादायक व्यवसायांबाबत प्रशासनाच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.






