स्थानिक

अर्थखाते लवकरच राष्ट्रवादीकडे येईल”; बारामतीत जय पवार यांचे मोठे विधान

अजितदादांच्या स्मारकाचीही घोषणा; विकासकामे रखडल्याच्या चर्चांना दिले उत्तर

अर्थखाते लवकरच राष्ट्रवादीकडे येईल”; बारामतीत जय पवार यांचे मोठे विधान

अजितदादांच्या स्मारकाचीही घोषणा; विकासकामे रखडल्याच्या चर्चांना दिले उत्तर

बारामती वार्तापत्र 

बारामती येथे आयोजित ‘कृतज्ञता स्नेहमेळावा’ कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी राज्याच्या अर्थखात्याबाबत महत्त्वाचे विधान करत, “मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून अर्थखाते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसकडे परत येईल, अशी अपेक्षा आहे,” असे सांगितले.

बारामती पंचायत समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या सहवासात काम केलेले आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जय पवार यांनी देशातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन करत, अजितदादांच्या निधनाबद्दल भावनिक शब्दांत श्रद्धांजली वाहिली.

अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे नसल्यामुळे विकासकामे रखडली असल्याची चर्चा होत असली, तरी प्रत्यक्षात तसे काही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थखात्याची जबाबदारी स्वतःकडे घेतली होती, असे त्यांनी सांगितले.

यापुढे बोलताना जय पवार म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांशी याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे येईल, अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील जनतेइतकीच आम्हालाही या विषयाची काळजी आहे, कारण अजित पवार आमचे वडील आहेत.”याच कार्यक्रमात त्यांनी बारामती येथे स्वर्गीय अजितदादा पवार यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहितीही दिली.

दरम्यान, राज्याच्या अर्थखात्याचा कारभार सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून, ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे कधी सोपवले जाईल, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Back to top button