माळेगाव बु

‘शारदा महिला संघा’ चे कौतुकास्पद पाऊल: कॅन्सर मुक्त महिला अभियानाची घोषणा! केरळच्या आरोग्य संस्थेच्या मदतीने बारामतीसह ६ तालुक्यातील हजारो महिलांची करणार उच्च दर्जाची कर्करोग तपासणी!

'चला उद्योजक घडवूया'

‘शारदा महिला संघा’ चे कौतुकास्पद पाऊल: कॅन्सर मुक्त महिला अभियानाची घोषणा! केरळच्या आरोग्य संस्थेच्या मदतीने बारामतीसह ६ तालुक्यातील हजारो महिलांची करणार उच्च दर्जाची कर्करोग तपासणी!

‘चला उद्योजक घडवूया’

बारामती वार्तापत्र 

महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासोबतच शारीरिकदृष्ट्या निरोगी राहणेही काळाची गरज आहे. कॅन्सरसारख्या आजाराला वेळीच ओळखून त्याचा धोका टाळण्यासाठी ‘शारदा महिला संघ’ कॅन्सर मुक्त महिला अभियान राबवणार असून त्यासाठी केरळमधील कार्किनोस फाउंडेशनच्या मार्फत आंतरराष्ट्रीय दर्जाची महिलांची कॅन्सर तपासणी करणार आहे.

त्याची सुरुवात बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, कर्जत आणि जामखेड या तालुक्यामधून केली जाणार आहे अशी माहिती ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सचिव व शारदा महिला संघाच्या प्रमुख सुनंदा पवार यांनी दिली.

​वाढत्या कॅन्सरच्या पार्श्वभूमीवर महिलांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आणि त्यांना आरोग्याचे सुरक्षाकवच देण्यासाठी बारामतीच्या ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदा महिला संघाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला आहे.

जंक्शन येथे आयोजित ‘चला उद्योजक घडवूया’ या महिला मेळाव्यात संस्थेच्या विश्वस्त सौ. सुनंदा पवार यांनी या महत्त्वपूर्ण मोहिमेची घोषणा केली. शारदा महिला संघाशी जोडल्या गेलेल्या हजारो महिला या अभियानामध्ये सुरुवातीला सहभागी होणार असून जास्तीत जास्त महिलांचा या अभियानामध्ये समावेश केला जाणार आहे.

आणखी २५,००० महिलांना जोडण्याचे उद्दिष्ट; २३ हजारांचा टप्पा पार!

शारदा महिला संघाच्या माध्यमातून सध्या ६ तालुक्यांमध्ये महिलांना संघटित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत तब्बल २३ हजारांपेक्षा जास्त महिला या चळवळीत सहभागी झाल्या आहेत. लवकरच २५ हजारांचा टप्पा पूर्ण करून या सर्व महिलांना त्यांच्या आवडीनुसार व गरजेनुसार प्रशिक्षण देऊन उद्योगाच्या मुख्य प्रवाहात आणले जाईल, असा विश्वास सौ. सुनंदा पवार यांनी व्यक्त केला.

केरळच्या कार्किनोस फाउंडेशनच्या मदतीने होणार कॅन्सर तपासणी

​महिलांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त करताना सौ. सुनंदा पवार म्हणाल्या, “आजच्या काळात सकस आहार मिळणे कठीण झाले आहे, त्यामुळे आपण घरच्या घरी आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. महिला कुटुंबाची काळजी घेतात, पण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणूनच, आरोग्याची वेळीच काळजी घेऊन भविष्यातील मोठा अनर्थ टाळण्यासाठी आम्ही केरळ येथील एका प्रथितयश व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेच्या माध्यमातून ६ तालुक्यांतील महिलांची कॅन्सर तपासणी करणार आहोत.”

स्पर्धेत टिकण्यासाठी उत्पादनांचा दर्जा महत्त्वाचा

​समाजातील आर्थिक अडचणींच्या काळात प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबाला हातभार लावत आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी महिलांनी ‘उत्कृष्ट गुणवत्ता आणि उत्तम दर्जाची उत्पादने’ निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे, असे आवाहन करत यासाठी ‘कृषी विज्ञान केंद्रा’ची (KVK) मदत व मार्गदर्शन घेण्याचे त्यांनी सुचवले. याशिवाय, मुलांवर चांगले संस्कार करणे ही देखील कुटुंबातील एक महत्त्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

Back to top button