दादा गेले…विकास थांबला? बारामतीत सरकारवर सुप्रिया सुळेंचा हाल्लाबोल
कामे थांबली ही लोकांची भावना

दादा गेले…विकास थांबला?
बारामतीत सरकारवर सुप्रिया सुळेंचा हाल्लाबोल
कामे थांबली ही लोकांची भावना
बारामती वार्तापत्र
महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत बारामतीतील विकास कामाचा वेग मंदावलाअसा आरोप केला. बारामतीत जलजीवन मिशन आणि स्मार्ट मीटरबाबत प्रचंड अस्वस्थता आहे. अनेक नागरिक सांगतात की, ‘दादा’ असताना ज्या वेगाने कामे होत होती, ती आता होत नाहीत. कामे थांबली ही लोकांची भावना आहे, असे सांगत त्यांनी थेट सरकारला लक्ष्य केले.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक आहे. मातीशी ईमान राखणाऱ्या शेतकऱ्याचे कंबरडे मोडण्याचे पाप सरकार करत आहे. मिसिंग लिंक प्रकल्पावरील दुर्घटनेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, पहिल्याच पावसात एवढी मोठी घटना घडली आणि तब्बल १८ तास मार्ग बंद राहिला.
मुख्यमंत्र्यांनी या प्रकाराची चौकशी करावी. एवढा गाजावाजा केलेल्या प्रकल्पाची ही अवस्था असेल, तर ठेकेदारांनाही उत्तर द्यावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. आता बारा वर्षे गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचेच सरकार आहे. सत्तर वर्षांचा हिशोब मागण्यापेक्षा स्वतःच्या बारा वर्षांचा हिशोब द्या. काँग्रेस-राष्ट्रवादीवर आरोप करून प्रश्न सुटणार नाहीत; जनता आता उत्तर मागेल,असे त्या म्हणाल्या.
——–
अयोध्या प्रकरणी उत्तर अपेक्षित
अयोध्या मंदिरातील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर बोलताना सुळे म्हणाल्या, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या मंदिरात जर भ्रष्टाचार होत असेल, तर त्याचे उत्तर सरकारने द्यावे. ज्यांनी आम्हाला भ्रष्टाचाराचे धडे दिले, त्यांनी प्रभू श्रीरामालाही सोडले नाही.
——-
असे असेल तर सत्ता घ्यावीच लागेल
आमची भूमिका सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची आहे. मात्र सरकारचा कारभार असाच सुरू राहिला, तर राष्ट्रवादी काँग्रेसला लढावेच लागेल आणि सत्ता घ्यावीच लागेल.
——-






