स्थानिक

इस्कॉन बारामतीची श्रीजगन्नाथ रथयात्रा २०२६ भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न 

सुमारे २००० नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी

इस्कॉन बारामतीची श्रीजगन्नाथ रथयात्रा २०२६ भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न 

सुमारे २००० नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी

बारामती वार्तापत्र 

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन), बारामती आयोजित तिसऱ्या वर्षीच्या श्रीजगन्नाथ रथयात्रा महोत्सवाला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी उपस्थित राहून भाविकांना शुभेच्छा दिल्या व भगवान श्रीजगन्नाथांचे आशीर्वाद सर्वांना लाभावेत, अशी सदिच्छा व्यक्त केली.

गदिमा सभागृह व पेन्सिल चौक येथून रथयात्रेला प्रारंभ झाला. उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष सचिन सातव, भरत गावडे पाटील, अभिजीत जाधव, रंजना तांबे, डॉ. रत्ना खरात, निर्मला भोईटे काकी, डॉ. सुनीता शहा (भगिनी मंडळ विश्वस्त), नगरसेवक अमोल कावळे, अल्ताफ सय्यद, नवनाथ बल्लाळ, श्रीमान नंददुलाल प्रभुजी, मंदिर व्यवस्थापक, मंदिर व्यवस्थापन समिती सदस्य, भक्त तसेच सुमारे २००० बारामतीकर नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.

फुलांनी सजलेला रथ, त्यावर विराजमान श्रीजगन्नाथ, बलदेव व सुभद्राजी, अखंड हरिनाम संकीर्तन, टाळ-मृदंगाचा निनाद, पारंपरिक नृत्य, आकर्षक सजावट, पर्यावरणपूरक उपक्रम, आध्यात्मिक पुस्तकांचे वितरण आणि प्रसाद सेवा यामुळे संपूर्ण शहर भक्तिमय झाले. रथयात्रा गदिमा सभागृह – पेन्सिल चौक – सिटी इन चौक – सहयोग सोसायटी – महानगर बँक मार्गे त्रिमूर्ती नगर येथील इस्कॉन मंदिरात विसावली.

यावेळी श्रीमान नंददुलाल प्रभुजी यांनी, रथ ओढणे म्हणजे दोरी ओढणे नव्हे, तर भक्तीची नाळ भगवंताशी जोडणे होय, रथ यात्रा म्हणजे श्री कृष्ण यांच्या प्रसन्नेकरिता त्यांना मंदिराबाहेर घेऊन जाणे जेणे करून ते असंख्य लोकांना आपल्या कृपादृष्टीने कृतार्थ करू शकतील. रथयात्रा आपल्या आनंदासाठी नसून भगवान श्रीजगन्नाथांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्या प्रेमाला प्रतिसाद देण्यासाठी साजरी केली जाते;
श्रीमती राधाराणी व व्रजवासीयांच्या विरहपूर्ण प्रेमाची सेवा करण्याच्या भावनेने, नामसंकीर्तन करत श्रीकृष्णांना वृंदावनात परत नेण्याच्या दिव्य भावात सहभागी होणे, हाच रथयात्रेचा खरा आध्यात्मिक अर्थ आहे.
भगवंतांना शक्ती, ऐश्वर्य किंवा बाह्य प्रदर्शन नव्हे, तर निर्मळ प्रेम, शुद्ध भावना आणि निःस्वार्थ सेवा प्रिय आहे; म्हणून प्रत्येक कृती शरीर, मन, वाणी आणि इंद्रियांनी केवळ त्यांच्या प्रसन्नतेसाठी अर्पण केली पाहिजे. असा भक्तिमय संदेश देत सर्व भक्त समुदायाचे आभार मानले. तसेच इस्कॉन बारामतीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आ. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार आणि सर्व भाविकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करून पुढील वर्षीही याच भक्तिभावाने पुन्हा भेटण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

Back to top button