आपला जिल्हा

‘आरोग्यसेवा हीच खरी समाजसेवा’;भरत शहा यांच्या सेवाकार्याचे कृषिमंत्री भरणे यांच्याकडून कौतुक

'औपचारिक कार्यक्रमांपेक्षा गरजू रुग्णांना आरोग्यसेवा हीच अजितदादांना खरी आदरांजली'

‘आरोग्यसेवा हीच खरी समाजसेवा’;भरत शहा यांच्या सेवाकार्याचे कृषिमंत्री भरणे यांच्याकडून कौतुक

‘औपचारिक कार्यक्रमांपेक्षा गरजू रुग्णांना आरोग्यसेवा हीच अजितदादांना खरी आदरांजली’

इंदापूर, आदित्य बोराटे :

“आरोग्यसेवा हे केवळ उपचाराचे नव्हे, तर माणुसकी जपण्याचे कार्य आहे. सेवाभावी भावनेतून इंदापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा यांनी आयोजित केलेले मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर समाजासाठी प्रेरणादायी आहे,” असे गौरवोद्गार राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढले.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व श्री नारायणदास रामदास शहा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. २६) शहा सांस्कृतिक भवन येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन कृषिमंत्री भरणे यांच्या हस्ते झाले.

यावेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, आप्पासाहेब जगदाळे,माजी नगराध्यक्ष अंकिता शहा, मुकुंद शहा, विलासराव माने, दत्तात्रय फडतरे, हनुमंतराव वाबळे, कांतीलाल झगडे, प्रतापराव पाटील, मधुकर भरणे, श्रीराज भरणे, लक्ष्मणराव गावळ, मच्छिंद्र चांदणे, शिवाजीराव तरंगे, डॉ. विद्युत शहा, संजय शहा, रोहन हेगडे, मिलिंद खाडे, डॉ.सुहास शेळके, श्रेणिक शहा, उदय कुरुडकर, अनिल शिर्के, पुंडे, नगरसेवक शकील सय्यद, प्रशांत उंबरे, उमेश मखरे, भारत शिंदे, शुभम पवार, ॲड अविनाश गवळी,प्रवीण हरणावळ,निखिल महाजन,मनोज राजगुरू, अजिंक्य डहाणे,अमोल माने,गौरव राऊत यांच्यासह पुणे व मुंबई येथील नामांकित डॉक्टर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना भरणे म्हणाले, “समाजातील गरजू घटकांपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविणे ही काळाची गरज आहे. भरत शहा यांनी सामाजिक बांधिलकी जपत हाती घेतलेला हा उपक्रम अनेकांसाठी दिलासादायक ठरणार असून, सेवाभावी कार्याचा आदर्श निर्माण करणारा आहे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत नगराध्यक्ष भरत शहा यांनी केले. आभार नगरसेवक अक्षय सूर्यवंशी यांनी मानले.दरम्यान, नगराध्यक्ष भरत शहा म्हणाले, “दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त औपचारिक कार्यक्रम करण्यापेक्षा गोरगरीब रुग्णांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, हीच त्यांना खरी आदरांजली आहे.”

चौकट:अत्याधुनिक रुग्णालय उभारणीसाठी प्रयत्न

इंदापूर तालुक्यात आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी रुग्णालयासाठी शहरातील मोक्याची जागा उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D