आपला जिल्हा

कर थकीत, दंड प्रलंबित… तरीही रस्त्यावर ‘दादागिरी’; बारामती वाहतूक शाखेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

वाहतूक शिस्तीला हरताळ? थकीत कर-दंड असलेली कार शहरात बिनधास्त

कर थकीत, दंड प्रलंबित… तरीही रस्त्यावर ‘दादागिरी’; बारामती वाहतूक शाखेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

वाहतूक शिस्तीला हरताळ? थकीत कर-दंड असलेली कार शहरात बिनधास्त

बारामती वार्तापत्र 

बारामती शहरात वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, असा प्रश्न उपस्थित करणारी एक बाब समोर आली आहे. एमएच ४२ एच २४४२ क्रमांकाच्या कारचा गेल्या चार वर्षांपासून वाहन कर थकीत असून, विविध वाहतूक नियमभंग प्रकरणांतील सुमारे ₹७,२०० चा ई-चलन दंडही प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. तरीही संबंधित वाहन शहरात बिनधास्तपणे फिरत असल्याचा आरोप होत असून, वाहतूक शाखेच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

गुणवडी–बारामती मार्गावरील पानगल्ली चौक हा वाहतूक कोंडी आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे कायम चर्चेत असतो. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित कार अनेकदा बेशिस्त पार्किंग, भरधाव वाहन चालविणे तसेच इतर वाहनांना अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने उभी केली जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी वाढत असून अपघाताचा धोका निर्माण होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

याशिवाय, परिसरात रात्रीच्या वेळी ‘ड्रिंक अँड ड्राइव्ह’च्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचीही चर्चा आहे. या संदर्भातही संबंधित वाहनाचा उल्लेख नागरिकांकडून केला जात आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

नागरिकांचे म्हणणे आहे की, वाहतूक विभागाकडे ई-चलन प्रणालीसह वाहनांची संपूर्ण डिजिटल माहिती उपलब्ध असताना, कर थकीत आणि दंड प्रलंबित असलेली वाहने रस्त्यावर कशी फिरत आहेत, हा गंभीर प्रश्न आहे. किरकोळ नियमभंग करणाऱ्या सामान्य वाहनचालकांकडून तात्काळ दंड वसूल केला जातो, मात्र वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई का होत नाही, अशी विचारणा नागरिक करत आहेत.

बारामतीत वाहतूक शिस्त प्रस्थापित करण्यासाठी केवळ हेल्मेट तपासणी किंवा कागदपत्रांची पडताळणी पुरेशी नसून, बेशिस्त पार्किंग, भरधाव वाहनचालक, दादागिरी करणारे तसेच कर आणि दंड थकवूनही रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांवर समान आणि कठोर कारवाई करण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D