बारामतीतील जामदार रोड प्रकरण गूढमय; कॅलेंडरवरील नोंदींमुळे तपासाची दिशा बदलणार? ‘No Result’ची नोंद चर्चेत
पत्नीच्या पोलीस कोठडीनंतर तपासाला वेग.

बारामतीतील जामदार रोड प्रकरण गूढमय; कॅलेंडरवरील नोंदींमुळे तपासाची दिशा बदलणार? ‘No Result’ची नोंद चर्चेत
पत्नीच्या पोलीस कोठडीनंतर तपासाला वेग.
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील जामदार रोड परिसरात पतीला कथितरित्या औषध देऊन बेशुद्ध केल्यानंतर जिवंत पुरून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाच्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकरणातील आरोपी महिलेला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून, घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे.
यापूर्वी ७१ वर्षीय सासऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीनुसार, आरोपीने तिच्या पतीला कथितरित्या औषध देऊन अर्धबेशुद्ध केले, त्यानंतर मारहाण करून घरातील कट्ट्यात झोपवून त्यावर फरशी बसवून जिवंत पुरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, तपासादरम्यान घरात असलेल्या एका कॅलेंडरवर दोन वेगवेगळ्या तारखांसमोर “No Result” अशी इंग्रजीतील नोंद आढळल्याची माहिती समोर आली आहे. या नोंदीमुळे प्रकरणातील गूढ अधिक वाढले असून, त्या नोंदीचा नेमका अर्थ काय, त्या कोणत्या संदर्भात लिहिण्यात आल्या आणि त्यांचा या कथित घटनेशी काही संबंध आहे का, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, “No Result” या नोंदींचा जादूटोणा, वैयक्तिक वाद, प्रेमसंबंध, आर्थिक कारण किंवा इतर कोणत्याही विशिष्ट कारणाशी संबंध असल्याचा अधिकृत निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे या नोंदींबाबत कोणताही तर्क किंवा निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे तपास यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी सांगितले की, पोलीस कोठडीदरम्यान आरोपीची सखोल चौकशी, घटनास्थळावरील पुरावे, मोबाईल फोन व इलेक्ट्रॉनिक माहिती, वैद्यकीय अहवाल तसेच संबंधित व्यक्तींचे जबाब यांच्या आधारे या प्रकरणामागील नेमके कारण उघड होण्याची शक्यता आहे.






