केबलच्या खड्ड्यामुळे अपघात; युवकाच्या पायाला गंभीर दुखापत, ठेकेदारावर कारवाईची मागणी
पुणे-सोलापूर सर्व्हिस रोडवर धोकादायक खड्डा;बॅरिकेट्स नाहीत, रिफ्लेक्टर नाहीत

केबलच्या खड्ड्यामुळे अपघात; युवकाच्या पायाला गंभीर दुखापत, ठेकेदारावर कारवाईची मागणी
पुणे-सोलापूर सर्व्हिस रोडवर धोकादायक खड्डा;बॅरिकेट्स नाहीत, रिफ्लेक्टर नाहीत
इंदापूर;प्रतिनिधि
पुणे-सोलापूर महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर केबल टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या खोल खड्ड्यामुळे दुचाकीस्वाराचा गंभीर अपघात झाल्याची घटना इंदापूर तालुक्यातील डाळज येथे घडली. या अपघातात दशरथ भोसले यांच्या पायाला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
दशरथ भोसले हे दुचाकीवरून घराकडे जात असताना सर्व्हिस रोडवरील केबलच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात त्यांची दुचाकी आदळली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले.
दरम्यान, कामाच्या ठिकाणी वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेले बॅरिकेट्स, सूचना फलक किंवा रेडियम रिफ्लेक्टर लावण्यात आले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी हा खड्डा वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या ठिकाणी यापूर्वीही अपघात झाल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला असून, केबल टाकण्याचे काम करणारी संबंधित कंपनी आणि ठेकेदार यांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
“नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने काम करणाऱ्या संबंधित कंपनी व ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी जखमी दशरथ भोसले यांनी केली आहे.
दरम्यान, महामार्गालगत सुरू असलेल्या अशा कामांदरम्यान वाहतूक सुरक्षेच्या नियमांचे पालन केले जात आहे का, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. अपघातानंतर प्रशासन संबंधित कंपनी व ठेकेदारावर कोणती कारवाई करणार, तसेच धोकादायक खड्डा तातडीने सुरक्षित करण्यात येणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.






