बारामतीतील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात ‘जागरूक विद्यार्थिनी – सुरक्षित भविष्य’वर मार्गदर्शन
विद्यार्थिनींनी वाचनाची सवय लावून घ्यावी

बारामतीतील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात ‘जागरूक विद्यार्थिनी – सुरक्षित भविष्य’वर मार्गदर्शन
विद्यार्थिनींनी वाचनाची सवय लावून घ्यावी.
बारामती वार्तापत्र
अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील महिला सबलीकरण समिती, कनिष्ठ विभागाच्या वतीने जिवराज सभागृहात ‘जागरूक विद्यार्थिनी – सुरक्षित भविष्य’ या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींमध्ये सुरक्षितता, कायदे, सोशल मीडिया आणि बदलत्या तंत्रज्ञानाबाबत जागृती निर्माण करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमासाठी बारामती शहरातील प्रसिद्ध वकील ॲड. प्रिया गुजर आणि शक्ती अभियान प्रमुख सौ. वनिता कदम प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या.
सौ. वनिता कदम यांनी विद्यार्थिनींना व्यसनाधीनतेपासून दूर राहणे, वाहतुकीचे नियम पाळणे, मित्रांची संगत आणि सोशल मीडियाचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. सुरक्षित आणि जबाबदार जीवनशैलीसाठी विद्यार्थिनींनी योग्य निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
ॲड. प्रिया गुजर यांनी सायबर सिक्युरिटी, AIचा सुयोग्य वापर, १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांशी संबंधित कायदे आणि समाजमाध्यमांचा सजग वापर याबाबत माहिती दिली. तसेच जागतिक स्तरावरील LinkedIn : Community & Network आणि Coursera यांसारख्या प्लॅटफॉर्मचे महत्त्व व उपयोग विद्यार्थिनींना समजावून सांगितले.
विद्यार्थिनींनी वाचनाची सवय लावून घ्यावी आणि आभासी जगात अधिक वेळ न घालवता प्रत्यक्ष जीवनातील ज्ञान व अनुभवांना महत्त्व द्यावे, असा मौलिक सल्लाही ॲड. गुजर यांनी दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. गोरखनाथ मोरे होते. स्वागत व प्रास्ताविक सौ. आश्विनी काकडे यांनी केले. सूत्रसंचालन सौ. वैशाली मुरुमकर यांनी, तर आभार सौ. सुषमा बनकर यांनी मानले.
प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिला सबलीकरण समिती प्रमुख, कनिष्ठ विभाग सौ. वैशाली माळी आणि समिती सदस्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. संजय शेंडे उपस्थित होते.
विद्यार्थिनींच्या सुरक्षितता, व्यक्तिमत्त्व विकास आणि डिजिटल युगातील जबाबदार वर्तनासाठी या कार्यक्रमातून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले.






