क्राईम रिपोर्ट

‘हा पतंगाचा दोर नाही, मृत्यूचा सापळा!’ बारामती पोलिसांची नायलॉन मांजावर कारवाई

६,४०० रुपयांचा मांजा जप्त

‘हा पतंगाचा दोर नाही, मृत्यूचा सापळा!’ बारामती पोलिसांची नायलॉन मांजावर कारवाई

६,४०० रुपयांचा मांजा जप्त

बारामती वार्तापत्र 

पतंग उडविण्याच्या उत्साहात नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या प्रतिबंधित नायलॉन व सिंथेटिक मांजाविरोधात बारामती शहर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. गुणवडी येथील वायसेवस्ती परिसरात पोलिसांनी सापळा रचून कारवाई करत १६ नग प्रतिबंधित नायलॉन मांजाचे रिल जप्त केले असून, एकूण ६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

१६ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ५.३५ वाजता गुणवडी गावच्या हद्दीतील वायसेवस्ती येथे प्रतिबंधित नायलॉन मांजाची साठवणूक व विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी तातडीने सापळा रचला. या कारवाईत ओम गणेश वायसे (वय २४, रा. गुणवडी वायसेवस्ती, ता. बारामती, जि. पुणे) याच्या ताब्यातून वेगवेगळ्या रंगांचे १६ नायलॉन मांजाचे रिल जप्त करण्यात आले.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गिरीश गणपत नेवसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३३५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२३ व १२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार ज्ञानदेव क्षीरसागर करीत आहेत.

दुचाकीस्वार, पक्षी आणि प्राण्यांसाठी गंभीर धोका

नायलॉन किंवा सिंथेटिक मांजा अत्यंत धारदार असल्याने रस्त्यावरून जाणारे दुचाकीस्वार, पादचारी, लहान मुले तसेच पक्षी आणि प्राणी यांच्यासाठी तो जीवघेणा ठरू शकतो. गळ्याला किंवा शरीराच्या अन्य भागाला मांजा अडकल्यास गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते.

याच पार्श्वभूमीवर बारामती शहर पोलिसांनी प्रतिबंधित मांजाची विक्री, साठवणूक आणि वापर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

घरात किंवा गोदामात लपवला तरी कारवाई

प्रतिबंधित मांजा दुकानात उघडपणे विकण्याऐवजी घरात, गोदामात, बॉक्समध्ये किंवा अन्य ठिकाणी लपवून ठेवला जात असल्यास अशा साठ्यांवरही पोलिसांचे लक्ष राहणार आहे. तसेच ऑनलाइन माध्यमातून प्रतिबंधित मांजाची विक्री किंवा पुरवठा करणाऱ्यांविरोधातही उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पालकांनीही दक्ष राहण्याचे आवाहन

मुलांना पतंग उडविताना कोणत्या प्रकारचा मांजा दिला जात आहे, याची पालकांनी काळजी घ्यावी. प्रतिबंधित नायलॉन मांजाचा वापर होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

“पतंग उडवा, आनंद साजरा करा; मात्र कोणाच्याही जीवाला धोका निर्माण होईल असा मांजा वापरू नका,” असे आवाहन बारामती शहर पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत इंगवले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपास पथकातील पोलीस हवालदार ज्ञानदेव क्षीरसागर आणि पोलीस शिपाई गिरीश नेवसे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक किंवा वापर करणाऱ्यांविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचा स्पष्ट इशारा बारामती शहर पोलिसांनी दिला आहे.

Back to top button