पत्रकार सुशील थोरात यांच्यावरील हल्ल्याचा बारामती पत्रकारांचा निषेध; हल्लेखोरांवर मकोका लावण्याची मागणी
हल्लेखोरांवर मकोका लावण्याची मागणी

पत्रकार सुशील थोरात यांच्यावरील हल्ल्याचा बारामती पत्रकारांचा निषेध; हल्लेखोरांवर मकोका लावण्याची मागणी
हल्लेखोरांवर मकोका लावण्याची मागणी
बारामती वार्तापत्र
अहिल्यानगर येथील ‘साम टीव्ही’चे प्रतिनिधी पत्रकार सुशील थोरात यांच्यावर १५ ते २० जणांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्याचा बारामतीतील पत्रकार बांधवांनी तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणातील सर्व हल्लेखोरांची तातडीने ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच मकोका कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी बारामती उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
पत्रकार थोरात यांनी कथित अवैध व्यवसायाबाबत वृत्तांकन केल्यापासून त्यांच्यावर हल्ला करण्याची संधी शोधली जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. चारचाकी वाहनाला डॅश लागल्याच्या किरकोळ कारणावरून हल्ला करण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हल्ल्यावेळी धमकीवजा भाषा वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, समाजातील विविध प्रश्न जनतेसमोर मांडण्याचे तसेच प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करतात. कर्तव्य बजावत असलेल्या पत्रकारावर अशा प्रकारे हल्ला होणे ही गंभीर बाब असून, यामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे पत्रकारांनी म्हटले आहे.
या प्रकरणातील सर्व आरोपींची तातडीने ओळख पटवून त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यासह लागू असलेल्या संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करावा, मकोका अंतर्गत कारवाई करावी आणि प्रकरणाचा निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करून पत्रकारांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. पत्रकार सुशील थोरात यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत सर्व दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.






