सोमेश्वर कारखान्यासाठी शरद पवार गटाचा ‘शेतकरी पॅनल’; युगेंद्र पवार म्हणाले, “स्वबळावर निवडणूक लढवणार”
५ गटांत १३० ते १४० इच्छुकांचे अर्ज

सोमेश्वर कारखान्यासाठी शरद पवार गटाचा ‘शेतकरी पॅनल’; युगेंद्र पवार म्हणाले, “स्वबळावर निवडणूक लढवणार”
५ गटांत १३० ते १४० इच्छुकांचे अर्ज
“सगळे मदतीला येतील, आम्ही शेतकरी पॅनल उभं करतोय”
बारामती वार्तापत्र
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, शरद पवार गटाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत या मुलाखती घेण्यात येत असून, इच्छुकांकडून मिळालेल्या प्रतिसादाबाबत युगेंद्र पवार यांनी समाधान व्यक्त केले.
“पाच गटांमध्ये तब्बल १३० ते १४० अर्ज आले आहेत. आमचा पक्ष लोकशाही पद्धतीने चालतो. कारखान्याचे हित पाहणारे उमेदवार निवडण्यासाठी मुलाखती घेतल्या जात आहेत,” अशी माहिती युगेंद्र पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
प्रस्ताव नाही; स्वबळावर शेतकरी पॅनल
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत आघाडी अथवा इतर पक्षांसोबत युती होणार का, या चर्चेवर बोलताना युगेंद्र पवार यांनी सध्या तरी स्वतंत्र पॅनल उभे करण्याची भूमिका स्पष्ट केली.
“सध्या तरी आम्ही स्वतंत्र पॅनल उभं करत आहोत. आम्हाला कोणाकडूनही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे आम्ही स्वबळावर शेतकरी पॅनल उभं करत आहोत,” असे त्यांनी सांगितले.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीवेळी यापूर्वी प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, त्यावेळी अपेक्षेप्रमाणे उमेदवार घेण्यात आले नाहीत. “तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे,” असेही युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.
सहकारात राजकारण नको; कारखाना व्यवस्थित चालला पाहिजे
सहकारी संस्थांच्या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेपापेक्षा सभासद आणि कारखान्याचे हित महत्त्वाचे असल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितले.
“शरद पवार यांचे म्हणणे आहे की सहकारामध्ये आपण राजकारण केले नाही पाहिजे. शेवटी हा प्रपंचाचा प्रश्न आहे. कारखाना व्यवस्थित चालला पाहिजे. चांगली, उच्चशिक्षित आणि कारखान्याचे हित पाहणारी लोक आपण निवडून दिली पाहिजेत,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
“सगळे आम्हाला ताकद देतील”
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे, शरद पवार आणि रोहित पवार यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते लक्ष घालतील, असा विश्वासही युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला.
“हे इलेक्शन सोमेश्वर कारखान्याचे आहे. प्रचाराला सगळे येतील आणि सगळे आम्हाला मदत करतील. सहकारामध्ये सगळे सभासद एकत्र येतात. सुप्रिया सुळे इथे लक्ष घालतील. शरद पवार यांना विनंती करणार आहे. रोहित पवारही लक्ष घालतील. सगळे आम्हाला ताकद देतील,” असे ते म्हणाले.
“युगेंद्र पवार हा कार्यकर्ता; अंतिम निर्णय वरिष्ठांचा”
स्वतःच्या भूमिकेबाबत बोलताना युगेंद्र पवार यांनी आपण पक्षातील कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट केले. “युगेंद्र पवार हा कार्यकर्ता आहे. आमच्या पक्षातील वरिष्ठ नेते असतील, ते निर्णय घेतील,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्याने आगामी काळात पॅनलची अंतिम रचना, उमेदवारांची निवड आणि निवडणुकीतील समीकरणे याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.






