पिस्तूल कोण देतंय? अल्पवयीन मुलाकडून शस्त्र जप्तीनंतर बारामतीत पुरवठा साखळीचा मुद्दा चर्चेत!
गावठी पिस्तूल कोणाकडून मिळाले?

पिस्तूल कोण देतंय? अल्पवयीन मुलाकडून शस्त्र जप्तीनंतर बारामतीत पुरवठा साखळीचा मुद्दा चर्चेत!
गावठी पिस्तूल कोणाकडून मिळाले?
बारामती वार्तापत्र
बारामती तालुका पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने बेकायदा गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तांबे नगर परिसरात एका अल्पवयीन मुलाकडून गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी संबंधित अल्पवयीन मुलाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती विभागात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या व्यक्तींची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने तालुका पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची विशेष मोहीम सुरू आहे. याच मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत एका अल्पवयीन मुलाकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी संबंधित मुलाचा शोध घेतला. तो बारामती शहरातील तांबे नगर परिसरात आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याची झडती घेतली. या झडतीमध्ये त्याच्याकडे गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस मिळून आले. पोलिसांनी सदर शस्त्र व काडतूस ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावठी पिस्तूल कोणाकडून मिळाले? तपास सुरू
हस्तगत करण्यात आलेले गावठी पिस्तूल संबंधित अल्पवयीन मुलाला कोणाकडून मिळाले, त्याचा पुरवठा कोणी केला आणि या प्रकरणामागे अन्य व्यक्तींचा सहभाग आहे का, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. शस्त्राच्या स्रोताचा शोध घेण्याच्या दृष्टीने तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाळुंज, सहायक फौजदार निकम आणि पोलीस हवालदार नाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
बारामती परिसरात बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत असून, अशा प्रकारच्या शस्त्रांची उपलब्धता आणि पुरवठा याबाबत पोलिसांकडून तपास व कारवाई सुरू आहे.






