आपला जिल्हा

१५ वर्षांची अखंड परंपरा! बिरजू मांढरे यांच्या साई पालखीचे शिर्डीकडे प्रस्थान; शेकडो भक्तांचा जयघोष!

एकता आणि सेवाभावाचा संदेश देत शिर्डीच्या दिशेने मार्गस्थ झाला.

१५ वर्षांची अखंड परंपरा! बिरजू मांढरे यांच्या साई पालखीचे शिर्डीकडे प्रस्थान; शेकडो भक्तांचा जयघोष!

एकता आणि सेवाभावाचा संदेश देत शिर्डीच्या दिशेने मार्गस्थ झाला.

बारामती वार्तापत्र 

‘श्रद्धा, सबुरी आणि सबका मालिक एक’ हा साईबाबांचा मानवतेचा संदेश समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने बारामती ते शिर्डी पायी साई पालखी सोहळ्याची परंपरा यंदाही भक्तिभावात सुरू झाली. बारामती नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक बिरजू मांढरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या पालखी सोहळ्याचे यंदा सलग १५ वे वर्ष असून, गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी शेकडो साईभक्तांच्या उपस्थितीत पालखीचे शिर्डीकडे प्रस्थान झाले.

बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या शुभहस्ते साईबाबांची आरती करण्यात आली. त्यानंतर भक्तिमय वातावरणात पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. नाथपंथीय, वारकरी संप्रदायातील महाराज, विविध धार्मिक संस्थांचे पदाधिकारी आणि शेकडो साईभक्त या सोहळ्यात सहभागी झाले होते. साईनामाचा जयघोष, भक्तिमय वातावरण आणि उत्साहपूर्ण सहभागामुळे परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले.

बिरजू मांढरे यांनी गेल्या १५ वर्षांपासून या पायी पालखी सोहळ्याच्या माध्यमातून असंख्य साईभक्तांना एकत्र जोडले आहे. विशेष म्हणजे, केवळ धार्मिक सोहळ्यापुरते मर्यादित न राहता व्यसनमुक्ती, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी साईबाबांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचा प्रयत्न केला आहे.

यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव म्हणाले की, साईबाबांच्या विचारांचा आदर करत बिरजू मांढरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीची उभारणी तसेच विविध समाजोपयोगी कामांमध्ये योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यातून साईबाबांचा सेवाभाव दिसून येतो.

नाथपंथीय सूरज महाराज थोरात यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, व्यसनमुक्ती अभियान आणि डॉ. आंबेडकर वसाहतीतील नागरिकांना विविध प्रकारे मदत करण्याच्या उपक्रमांचा उल्लेख केला. तर स्वामी श्रीपातीर्थ महाराज यांनी बारामतीच्या आध्यात्मिक इतिहासात नोंद घ्यावी असा पायी पालखी सोहळा आयोजित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

ह.भ.प. कपिल महाराज चव्हाण यांनी अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालत साईबाबांचे विचार पालखी सोहळ्याच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवले जात असल्याचे सांगितले.

यावेळी प्रास्ताविक करताना बिरजू मांढरे म्हणाले की, बारामती ते शिर्डी हा पायी पालखी सोहळा म्हणजे सर्व धर्म, जाती आणि पंथांतील लोकांना एकत्र आणण्याचा आध्यात्मिक प्रयत्न आहे. या माध्यमातून भाविकांना भक्तीचा आनंद, मानसिक समाधान आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

या सोहळ्याला नगरसेवक अमोल कावळे, अमर धुमाळ, सोमनाथ गजाकस, गणेश जोजारे, सूरज सातव, यादगार फाउंडेशनचे फिरोज बागवान, शक्तिपात महायोग साधनधाम ट्रस्टचे स्वामी श्रीपातीर्थ महाराज, नाथपंथीय जैनकवाडी ट्रस्टचे सूरज महाराज थोरात, संतोष आटोळे, संतोष सातव, सतीश खुडे, प्रमोद डिंबळे, धनंजय तेलंगे, शिर्डीचे पै. मदन मोकाटे, रामभाऊ सोनवणे, अनिल आलवणे, बाबूशेठ, तानाजी सोनवणे, अजित सोनवणे, भिवा तांबे, गणेश घोडे, सागर सोनवणे, तसेच ‘चांडाळ चौकडीच्या करामती’चे अभिनेते भरत शिंदे, रामभाऊ जगताप, सुभाष मदने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

साईच्छा सेवा ट्रस्ट, बीएम ग्रुप, वस्ताद लहुजी साळवे दहीहंडी मंडळ, कै. भाऊसाहेब मांढरे मित्र परिवार, श्रीहरी भाऊ तेलंगे मंडळ आणि जय भवानी मित्र मंडळ यांच्या वतीने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावळेपाटील यांनी केले, तर आभार राजू मांढरे यांनी मानले.

१५ वर्षांची अखंड श्रद्धेची परंपरा, समाजसेवेचा वसा आणि साईबाबांच्या विचारांचा प्रसार असा त्रिवेणी संगम साधणारा बिरजू मांढरे यांचा हा पायी पालखी सोहळा बारामतीकरांसाठी भक्ती, एकता आणि सेवाभावाचा संदेश देत शिर्डीच्या दिशेने मार्गस्थ झाला.

Back to top button