स्थानिक

गाडीचा नंबर हवा हटके? बारामतीत MH42CA नवी मालिका सुरू; १९ नोव्हेंबरपासून अर्जांची संधी!

एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज आल्यास लिलाव

गाडीचा नंबर हवा हटके? बारामतीत MH42CA नवी मालिका सुरू; १९ नोव्हेंबरपासून अर्जांची संधी!

एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज आल्यास लिलाव

बारामती वार्तापत्र 

आपल्या वाहनासाठी 0001, 0007, 0099, 1111 यांसारखा आकर्षक आणि पसंतीचा नोंदणी क्रमांक मिळवण्याची इच्छा असलेल्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात खासगी चारचाकी वाहनांच्या (LMV-NT) नवीन MH42CA नोंदणी क्रमांक मालिकेला १९ नोव्हेंबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील आकर्षक व पसंतीचे क्रमांक आरक्षित करण्यासाठी इच्छुकांना अर्ज करता येणार आहेत.

यासाठी बारामती आरटीओ कार्यालयात खिडकी क्रमांक २७ उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक वाहनधारकांनी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत विहित नमुन्यातील अर्ज, आवश्यक कागदपत्रे आणि निर्धारित शुल्काचा धनाकर्ष (डीडी) जमा करणे आवश्यक आहे. हा डीडी राष्ट्रीयीकृत बँकेचा असून ‘Dy. R.T.O., Baramati’ यांच्या नावे असणे बंधनकारक आहे.

अर्जासोबत पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत तसेच आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट किंवा पॅनकार्ड यापैकी छायाचित्र असलेल्या ओळखपत्राची साक्षांकित प्रत जोडावी लागणार आहे.

एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज आल्यास लिलाव

एखाद्या आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास संबंधित अर्जदारांची यादी २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

त्यानंतर संबंधित क्रमांकांचे वाटप सीलबंद लिफाफा पद्धतीने लिलावाद्वारे केले जाणार आहे. लिलावात सहभागी होण्यासाठी अर्जदारांना निर्धारित शुल्काव्यतिरिक्त स्वतःहून देऊ केलेल्या जादा रकमेचा स्वतंत्र डीडी जमा करावा लागेल. हा डीडी २० नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजेपर्यंत कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. डीडीवर अर्जदाराचे नाव आणि इच्छित वाहन क्रमांक स्पष्टपणे नमूद करावा लागणार आहे.

२० नोव्हेंबरला होणार लिलाव

२० नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत संबंधित अर्जदार किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीसमक्ष सीलबंद लिफाफे उघडण्यात येणार आहेत. पात्र अर्जदारांपैकी सर्वाधिक जादा रकमेचा डीडी सादर करणाऱ्या अर्जदाराला संबंधित पसंतीचा क्रमांक वितरित केला जाणार आहे.

लिलावाला उपस्थित राहणे अनिवार्य

लिलावाच्या वेळी अर्जदार किंवा त्यांचा अधिकृत प्रतिनिधी उपस्थित नसल्यास संबंधित अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच एकाच क्रमांकासाठी अर्ज केलेले सर्व अर्जदार अनुपस्थित राहिल्यास तो क्रमांक सर्वांसाठी खुला करण्यात येईल.

एकदा आरक्षित केलेला नोंदणी क्रमांक बदलून दिला जाणार नाही. निर्धारित मुदतीत वाहन सादर करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास क्रमांकाचे आरक्षण आपोआप रद्द होणार आहे. अशा परिस्थितीत भरलेले शुल्क परत मिळणार नाही किंवा अन्य शुल्कात समायोजितही केले जाणार नाही.

संपूर्ण लिलाव प्रक्रिया राबविणे, स्थगित करणे किंवा रद्द करण्याचे अधिकार सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती यांच्याकडे राखीव ठेवण्यात आले आहेत.

त्यामुळे MH42CA या नव्या मालिकेतील आकर्षक आणि पसंतीचे वाहन क्रमांक मिळवू इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे यांनी केले आहे..

Back to top button