गोपनीय माहिती, बोगस ग्राहक आणि थेट छापा! बारामती तालुका पोलिसांच्या कारवाईने लॉजमधील कथित अनैतिक व्यवसायाचा प्रकार चर्चेत!
महिलेला पैशांचे आमिष दाखवून देहव्यवसायास प्रवृत्त केल्याचा आरोप; बारामती-भिगवण रोडवरील लॉजमध्ये तालुका पोलिसांची कारवाई!

गोपनीय माहिती, बोगस ग्राहक आणि थेट छापा! बारामती तालुका पोलिसांच्या कारवाईने लॉजमधील कथित अनैतिक व्यवसायाचा प्रकार चर्चेत!
महिलेला पैशांचे आमिष दाखवून देहव्यवसायास प्रवृत्त केल्याचा आरोप; बारामती-भिगवण रोडवरील लॉजमध्ये तालुका पोलिसांची कारवाई!
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात अनैतिक व्यवसायाविरोधात तालुका पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. बारामती-भिगवण रस्त्यावरील एका लॉजमध्ये कथितरीत्या सुरू असलेल्या देहव्यवसायाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. बोगस ग्राहक पाठवून खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. या प्रकरणी लॉज मालकासह मॅनेजर आणि सफाई कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (दि. २३ नोव्हेंबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
बारामती तालुका पोलिसांचे पथक गस्तीवर असताना भिगवण रस्त्यावरील संबंधित लॉजमध्ये अनधिकृतपणे देहव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी माहितीची खातरजमा करण्यासाठी बोगस ग्राहक पाठविला. त्यानंतर खात्री पटताच लॉजवर छापा टाकण्यात आला.
या कारवाईदरम्यान लॉजचा मॅनेजर आदित्य पांडुरंग पवार (वय २२, रा. वंजारवाडी) आणि सफाई कर्मचारी महंमद नजीर शेख (वय ५४) हे पोलिसांना आढळून आले.
पोलिसांच्या फिर्यादीनुसार, लॉज मालक निलेश मच्छिंद्र शिंदे याच्या सांगण्यावरून महिलेला पैशांचे आमिष दाखवून देहव्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. पश्चिम बंगालमधील २६ वर्षीय महिलेच्या संदर्भात हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक राजीव वसंत शिंदे यांनी फिर्याद दिली असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम १४३ (३), ३ (५) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ मधील कलम ४ आणि ५ नुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक नारायण पवार पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, बारामती परिसरातील लॉजमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत व्यवसायांवर पोलिसांकडून आणखी कोणती कारवाई केली जाते आणि या प्रकरणाच्या तपासातून आणखी काय समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.






