बारामतीत थार चालकाची मुजोरी! वाहतूक पोलिसाला धडक देऊन चालक फरार; थरारक घटना CCTV मध्ये कैद!
डावा हात-पाय जखमी, चालकाविरुद्ध गंभीर आरोप!

बारामतीत थार चालकाची मुजोरी! वाहतूक पोलिसाला धडक देऊन चालक फरार; थरारक घटना CCTV मध्ये कैद
डावा हात-पाय जखमी, चालकाविरुद्ध गंभीर आरोप!
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसालाच वाहनाने उडवून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सम्यक चौकात वाहतूक नियमनाचे शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला काळ्या रंगाच्या महिंद्रा थार गाडीने धडक दिल्याची घटना 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. एवढेच नव्हे, तर गाडीच्या बोनेटवर पडलेल्या पोलिसाला चालकाने गाडी न थांबविता फरफटत नेल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या घटनेने बारामती शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमके काय घडले सम्यक चौकात?
फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय यशवंत भोसले हे बारामती वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सम्यक चौकात ते इतर पोलीस कर्मचारी, होमगार्ड आणि सुरक्षा रक्षकांसोबत वाहतूक नियमनाचे काम करीत होते.
त्यावेळी भिगवण चौकाकडून पेन्सिल चौकाच्या दिशेने काळ्या रंगाची, काळ्या काचा असलेली आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेली महिंद्रा थार येताना दिसली. वाहनाच्या नियमभंगाबाबत कारवाई करण्यासाठी भोसले यांनी हाताने इशारा करून गाडी थांबवली. त्यानंतर ई-चलन मशीनद्वारे वाहनाचा फोटो काढण्याची प्रक्रिया सुरू केली.
गाडीचा वेग वाढवला अन् पोलिसाला बोनेटवरून फरफटत नेले!
फिर्यादीत केलेल्या आरोपानुसार, पोलीस कर्मचारी गाडीसमोर उभे असल्याची जाणीव असतानाही चालकाने अचानक थारचा वेग वाढवून गाडी त्यांच्या अंगावर घातली. त्यामुळे भोसले हे गाडीच्या बोनेटवर पडले. मात्र, चालकाने गाडी थांबवण्याऐवजी त्यांना बोनेटवरून फरफटत नेल्याचा आरोप आहे.
काही अंतर पुढे गेल्यानंतर हाताची पकड सुटल्याने भोसले रस्त्यावर फेकले गेले. या घटनेत त्यांच्या डाव्या हाताला आणि डाव्या पायाला दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर चालकाने गाडीसह घटनास्थळावरून पळ काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
थारचा नंबर समोर; चालकाचे नावही फिर्यादीत!
घटनेनंतर पोलिसांनी संबंधित वाहनाचा क्रमांक MH-53-A-4400 असल्याची माहिती मिळवली. नाकाबंदी ॲपद्वारे वाहनमालकाची माहिती तपासल्यानंतर सदर थारचे मालक दत्तात्रय कृष्णा शेडगे असल्याचे समजले. त्यांच्याशी संपर्क साधला असता, घटनेच्या वेळी त्यांचा मुलगा धीरज शेडगे हा गाडी चालवत असल्याचे त्यांनी सांगितल्याचा उल्लेख फिर्यादीत आहे.
शासकीय कामात अडथळा आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप!
कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसाला गाडीने धडक देणे, बोनेटवरून फरफटत नेणे आणि त्यानंतर घटनास्थळावरून पळून जाणे, या प्रकारामुळे पोलिसांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय भोसले यांनी धीरज शेडगे याच्याविरुद्ध कायदेशीर फिर्याद दिली आहे. शासकीय कामात जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आता या प्रकरणात पोलिसांकडून कोणती कारवाई होते? संबंधित थार चालकावर कठोर कायदेशीर कारवाई होणार का? याकडे संपूर्ण बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.






