सोमेश्वर

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सोमेश्वर कारखान्याला भेट; साखर उद्योगाला दिलासा मिळवून देण्याचे आश्वासन

कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी साखरेच्या किमान विक्री मूल्यामध्ये वाढ करण्याची मागणी केली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सोमेश्वर कारखान्याला भेट; साखर उद्योगाला दिलासा मिळवून देण्याचे आश्वासन

कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी साखरेच्या किमान विक्री मूल्यामध्ये वाढ करण्याची मागणी केली.

बारामती वार्तापत्र 

साखर उद्योग सध्या आर्थिक अडचणींच्या भोवऱ्यात सापडला असून, शेतकरी, कामगार आणि कारखान्यांचे हित लक्षात घेऊन राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे शनिवारी सायंकाळी त्यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला भेट देत कारखान्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात असून, कारखान्याच्या आर्थिक आणि तांत्रिक अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाचा विस्तार, बॉयलर उभारणी, उत्पादन खर्चातील वाढ, तसेच साखरेच्या दरातील चढ- उतार यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली. साखर उद्योग टिकवण्यासाठी सरकारने ठोस धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी साखरेच्या किमान विक्री मूल्यामध्ये वाढ करण्याची मागणी केली. सध्याच्या परिस्थितीत उत्पादन खर्च वाढला असून, शेतकऱ्यांना योग्य दर देण्यासाठी केंद्र सरकारने एमएसपी वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सहवीज निर्मिती प्रकल्प तोट्यात जात असल्याने प्रति युनिट अनुदान वाढवण्याची मागणीही त्यांनी यावेळी मांडली. बैठकीस उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, राजवर्धन शिंदे, संभाजी होळकर, संग्राम सोरटे, शैलेश रसकर, बाळासाहेब कामथे, अभिजित काकडे यांच्यासह अनेक संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान,कामगारांचे प्रश्न,उसाचा खर्च,वीजदर आणि कारखान्यांच्या स्पर्धात्मक अडचणी यावरही सविस्तर चर्चा झाली. साखर उद्योग हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे उद्योग अडचणीत येऊ नये यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेईल, असे आश्वासन सुनेत्रा पवार यांनी दिले.

Back to top button