राजकीय

पोटनिवडणुकीनंतर अखेर राष्ट्रवादीची बारामतीतील बूथ कमिटी बरखास्त?

पक्ष नेतृत्व पुढाकार घेणार का

पोटनिवडणुकीनंतर अखेर राष्ट्रवादीची बारामतीतील बूथ कमिटी बरखास्त?

पक्ष नेतृत्व पुढाकार घेणार का

बारामती वार्तापत्र 

बारामतीत नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेत मोठी खळबळ उडाली असून, बूथ कमिट्यांच्या कार्यप्रणालीवरून पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. या पार्श्वभूमीवर काही बूथ कमिट्या बरखास्त करण्याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत विविध ठिकाणी बूथ कमिट्यांची स्थापना करण्यात आली होती.

या कमिट्यांवर मतदारांशी संपर्क साधणे, मतदानाच्या दिवशी यंत्रणा सक्षम ठेवणे आणि पक्षाच्या उमेदवाराला विजय मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांचे समन्वय साधणे अशी महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

मात्र, २३ एप्रिल रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत या कमिट्यांच्या कामकाजात अनेक त्रुटी आढळून आल्याचे सांगितले जात आहे. काही ठिकाणी समन्वयाचा अभाव, तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांमधील अंतर्गत मतभेद उघड झाल्याने पक्ष नेतृत्व नाराज असल्याची चर्चा आहे.

याच वादाचे पडसाद आता उघडपणे दिसू लागले आहेत. बारामती तालुक्यातील एका गावात बूथ कमिटीच्या वादातून गंभीर घटना घडल्याचे समोर आले आहे. एका माजी सरपंच आणि विद्यमान कमिटी सदस्य यांच्यातील वाद अचानक चिघळला. या वादाचे रूपांतर थेट हिंसाचारात झाले असून, माजी सरपंचावर कुऱ्हाडीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

या घटनेदरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक, धक्काबुक्की आणि मारहाणीचे प्रकारही घडल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, हा वाद सुरुवातीला किरकोळ कारणावरून — जेवणाच्या बिलाच्या मुद्द्यावरून — सुरू झाला, मात्र त्यानंतर त्याला राजकीय रंग चढत गेला आणि परिस्थिती हाताबाहेर गेली.

या घटनेची माहिती मिळताच प्रकरण माळेगाव पोलीस ठाण्यात पोहोचले असून, पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या सर्व घडामोडींमुळे बारामतीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

पक्षाच्या संघटनात्मक शिस्तीवर आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आगामी काळात पक्षाकडून कडक निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

बूथ कमिट्यांची पुनर्रचना, जबाबदार पदाधिकाऱ्यांवर कारवाई आणि कार्यकर्त्यांमध्ये शिस्त प्रस्थापित करण्यासाठी पक्ष नेतृत्व पुढाकार घेणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button