अजितदादांच्या अवमानावर सभागृह गप्प ? निषेधासाठी फक्त तीन नगरसेवक पुढे; उर्वरितांचे मौन संशयास्पद
“निषेध करण्याचे धैर्य फक्त तिघांनी दाखवले

अजितदादांच्या अवमानावर सभागृह गप्प ?
निषेधासाठी फक्त तीन नगरसेवक पुढे; उर्वरितांचे मौन संशयास्पद
“निषेध करण्याचे धैर्य फक्त तिघांनी दाखवले
बारामती वार्तापत्र
बारामती नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याविषयी कथित वादग्रस्त वक्तव्य झाले, मात्र त्यानंतर सभागृहातील बहुसंख्य नगरसेवकांनी घेतलेले मौन आता चर्चेचा विषय बनले आहे. अजितदादांच्या नेतृत्वामुळे राजकीय ओळख मिळालेल्या अनेकांनी या प्रसंगी एक शब्दही उच्चारला नाही, याबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, नगरसेवक अमर धुमाळ, नवनाथ बल्लाळ आणि विशाल हिंगणे यांनीच उघडपणे निषेधाची भूमिका घेतली. उर्वरित नगरसेवक मात्र मौन बाळगत राहिले. त्यामुळे “अजितदादांवरील निष्ठा केवळ भाषणांपुरतीच होती का?” असा सवाल आता बारामतीकर उपस्थित करत आहेत.
ज्यांच्या राजकीय कारकिर्दीला अजितदादांच्या नेतृत्वाची साथ लाभली, त्याच लोकप्रतिनिधींनी त्यांच्या स्मृतींचा अवमान होत असताना मौन धारण करणे हे अनेकांच्या पचनी पडलेले नाही. सभागृहात निषेधाचा एक साधा शब्दही न काढणाऱ्या नगरसेवकांच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राजकीय मतभेद असू शकतात; पण दिवंगत नेत्यांबाबतची सभ्यता आणि आदर ही लोकशाहीची किमान अपेक्षा आहे. त्या अपेक्षेलाच तिलांजली देण्यात आली का, अशी चर्चा आता शहरभर रंगली आहे.
अजितदादांच्या नावावर मते मागणारे आणि त्यांच्या वारशाचा दावा करणारे अनेक जण या प्रसंगी गप्प राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. “निषेध करण्याचे धैर्य फक्त तिघांनी दाखवले, मग बाकीचे नेमके कोणाच्या दबावाखाली गप्प होते?” हा प्रश्न आता बारामतीच्या राजकारणात जोर धरू लागला आहे.






