बारामतीत ११७ तरुणांची सरकारी नोकरीच्या नावाखाली ३ कोटी ७३ लाखांची लूट; बनावट नियुक्तीपत्र फसवणुकीचा महाघोटाळा

बारामतीत ११७ तरुणांची सरकारी नोकरीच्या नावाखाली ३ कोटी ७३ लाखांची लूट; बनावट नियुक्तीपत्र फसवणुकीचा महाघोटाळा
बनावट नियुक्तीपत्रे, खोटे शिक्के आणि बनावट निवड यादीचा वापर; दोघांविरोधात गुन्हा दाखल
बारामती वार्तापत्र
बारामतीत सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तब्बल ११७ युवकांची सुमारे ३ कोटी ७३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संपर्क असल्याचे भासवून आरोग्य, वन, जलसंपदा, समाजकल्याण विभाग तसेच रेल्वे विभागात नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत लाखो रुपये उकळल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी रणजित हरिभाऊ मोटे (रा. सूर्यनगरी, बारामती) यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुभायु सरकार ऊर्फ रुणा (मूळ पश्चिम बंगाल, सध्या दिल्ली) आणि प्रमोद भगवान गुरव (रा. घणसोली, नवी मुंबई) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, खोटे शिक्के वापरणे आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, आरोपींनी २०२२ पासून सरकारी भरतीत निश्चित निवड करून देण्याचे आमिष दाखवत उमेदवारांकडून पदानुसार प्रत्येकी ५ ते ६ लाख रुपये ऑनलाईन व रोख स्वरूपात स्वीकारले. त्यानंतर २०२३-२४ च्या भरती प्रक्रियेसाठी ११७ उमेदवारांची कागदपत्रे व अर्ज गोळा करण्यात आले.
मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही उमेदवाराला सरकारी नोकरी मिळाली नाही. उलट उमेदवारांची दिशाभूल करण्यासाठी बनावट निवड यादी, खोटे शासकीय शिक्के आणि बनावट नियुक्तीपत्रे तयार करून वेळकाढूपणा करण्यात आला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधितांनी पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणाचा तपास बारामती तालुका पोलिस करत असून, आणखी काही पीडित अथवा संशयित समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारी नोकरीच्या आमिषाला बळी न पडता भरती प्रक्रियेची माहिती केवळ अधिकृत संकेतस्थळांवरूनच पडताळून पाहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे







