बारामतीतील मेडमध्ये सव्वा तीन लाखांचा गुटखा साठा जप्त; तिघांवर गुन्हा
अन्न सुरक्षा विभागाची कारवाई; प्रतिबंधित पानमसाला, तंबाखू आणि सुगंधित तंबाखूचा साठा पोलिसांच्या ताब्यात

बारामतीतील मेडमध्ये सव्वा तीन लाखांचा गुटखा साठा जप्त; तिघांवर गुन्हा
अन्न सुरक्षा विभागाची कारवाई; प्रतिबंधित पानमसाला, तंबाखू आणि सुगंधित तंबाखूचा साठा पोलिसांच्या ताब्यात
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील मेड येथे प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा करून ठेवल्याप्रकरणी तिघांविरुद्ध माळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा विभागाने केलेल्या कारवाईत तब्बल ३ लाख ५७ हजार ३२१ रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.
अन्न सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत सोमनाथ सावळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामदास बाळू मोरे (रा. मेड), गौरव जोगदंड (रा. तांदुळवाडी) आणि गणेश मदने (रा. बारामती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, मेड येथील गट क्रमांक ५७६ मधील एका खोलीची तपासणी करण्यात आली. यावेळी विक्री व वितरणासाठी शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पानमसाला आणि संबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला. कारवाईदरम्यान अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध प्रतिबंधित अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले असून उर्वरित साठा ताब्यात घेण्यात आला.जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये विमल पानमसाला, तंबाखू, डायरेक्टर पान मसाला, शॉर्ट चिटिंग तंबाखू, शिमला गुटखा आणि गुलाम गुटखा आदींचा समावेश असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
—–
खरेदीचे बिल नाही
चौकशीदरम्यान रामदास मोरे यांनी प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा गौरव जोगदंड आणि गणेश मदने यांच्याकडून खरेदी केल्याचे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. विशेष म्हणजे, या मालाच्या खरेदीबाबत बिल किंवा अधिकृत कागदपत्रे सादर करण्यात आली नसल्याचेही समोर आले आहे.
—–
या प्रकरणी अन्न सुरक्षा कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा पुरवठा, वाहतूक तसेच त्यामागील उत्पादक-वितरण साखळीपर्यंत तपास नेण्याची मागणी अन्न सुरक्षा विभागाकडून करण्यात आली आहे.माळेगाव पोलिस ठाण्यात ३० जून रोजी गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.






