दौंड हादरले!वादातून वृद्ध महिलेचा खून; मृतदेहाची विटंबना करून शीर केले गायब, पोलिसांचा झटपट तपास
पुरावा नष्ट करण्यासाठी शीर नेले दुसरीकडे;१२ तासांत दोघे गजाआड!

दौंड हादरले!वादातून वृद्ध महिलेचा खून; मृतदेहाची विटंबना करून शीर केले गायब, पोलिसांचा झटपट तपास
पुरावा नष्ट करण्यासाठी शीर नेले दुसरीकडे;१२ तासांत दोघे गजाआड!
दौंड; प्रतिनिधि
दौंड शहरातील आर.बी. १ नगरमोरी परिसरात ७० वर्षीय वृद्ध महिलेची निर्घृण हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सुमन किसन शिंदे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी महिलेचे शीर धडापासून वेगळे करून ते दुसऱ्या ठिकाणी नेऊन टाकल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर दौंड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेगाने तपास करत अवघ्या १२ तासांच्या आत दोघा संशयित आरोपींना अटक केली आहे. विकी उर्फ विक्रम अल्हाट आणि प्रसाद चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले आहे.
वादातून हत्येचा संशय
संबंधित वृद्ध महिला आपल्या घरी एकट्याच राहत होत्या. आरोपींचा आणि महिलेचा यापूर्वी वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून चार ते पाच दिवसांपूर्वी महिलेची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक तपासात संशय आहे.
हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने महिलेचे शीर धडापासून वेगळे करून ते दुसऱ्या ठिकाणी नेऊन टाकण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
दरम्यान, मृतदेह कुजण्यास सुरुवात झाल्यानंतर परिसरात उग्र वास येऊ लागला. याची माहिती दौंड पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी संशयित आरोपींपर्यंत पोहोचून दोघांना ताब्यात घेतले.
या प्रकरणाचा पुढील तपास दौंड पोलीस करत असून, हत्येचे नेमके कारण, घटनेचा कालावधी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी करण्यात आलेल्या हालचालींबाबत अधिक तपास सुरू आहे.






