माळेगावात धक्कादायक राडा! घरासमोरील कंपाउंड ट्रॅक्टरने पाडले; तरुणावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न, पाच जणांना अटक
कुटुंबीयांशी मारहाण-शिवीगाळ.

माळेगावात धक्कादायक राडा! घरासमोरील कंपाउंड ट्रॅक्टरने पाडले; तरुणावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न, पाच जणांना अटक
कुटुंबीयांशी मारहाण-शिवीगाळ.
बारामती वार्तापत्र
माळेगाव येथील शिवनगर परिसरात घरासमोरील कंपाउंड पाडल्याच्या कारणावरून झालेल्या वादात ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्यासह दगडाने व हाताने मारहाण, शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी सुमारे 11 वाजता शिवनगर, माळेगाव येथे ही घटना घडली. याप्रकरणी अविनाश बाळकृष्ण नरूटे यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, रणजीत लालासो ढोले हा नंबर नसलेल्या ट्रॅक्टरमधून घटनास्थळी आला. त्याने ट्रॅक्टरच्या समोरील लोखंडी फरांडीने घरासमोरील सिमेंटच्या विटांचे कंपाउंड वारंवार धडक देऊन पाडल्याचे तसेच नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
कंपाउंड पाडण्यास विरोध करत फिर्यादी अविनाश नरूटे व त्यांचे भाऊ नंदकिशोर हे ट्रॅक्टर थांबवण्यासाठी गेले असता, रणजीत ढोले याने ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर सुजित लालासो ढोले, तेजम सुनिल ढोले, सुनिल शंकर ढोले आणि बाळासो शंकर ढोले यांनी फिर्यादीसह त्यांच्या कुटुंबीयांना दगडाने व हाताने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. 253/2026 अन्वये BNS कलम 110, 118(1), 189(2), 191(2), 190, 115(2), 351(2), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याची नोंद 18 सप्टेंबर रोजी दुपारी 3.48 वाजता करण्यात आली. प्रकरणातील पाचही आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार लोंढे, बकल नं. 2420 यांनी केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साळवे करीत आहेत.






