बारामती तालुक्यात बेकायदेशीर शस्त्रांवर माळेगाव पोलिसांचा दणका! बारवनगरातून ७ हत्यारे जप्त; एकाविरुद्ध गुन्हा दाखल
तलवारी, कोयता, सत्तुर, सुरा अन् कु-हाडीसह ७ घातक शस्त्रे जप्त

बारामती तालुक्यात बेकायदेशीर शस्त्रांवर माळेगाव पोलिसांचा दणका! बारवनगरातून ७ हत्यारे जप्त; एकाविरुद्ध गुन्हा दाखल
तलवारी, कोयता, सत्तुर, सुरा अन् कु-हाडीसह ७ घातक शस्त्रे जप्त
बारामती वार्तापत्र
माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारवनगर येथे बेकायदेशीररीत्या घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत ७ हत्यारे जप्त केली आहेत. या कारवाईत तलवारी, कोयता, सत्तुर, सुरा आणि कु-हाड यांचा समावेश आहे.
दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास बारवनगर गावच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दादा नथुराम शिंदे (रा. बारवनगर, ता. बारामती, जि. पुणे) याच्याविरुद्ध माळेगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. २५४/२०२६ अन्वये शस्त्र अधिनियम १९५९ मधील कलम ४ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
🔴 नेमकी कोणती शस्त्रे जप्त?
पोलिसांनी आरोपीच्या राहत्या घरासमोरील परिसरातून पुढील शस्त्रे जप्त केली—
- स्टीलची तलवार – अंदाजे ₹५००
- लोखंडी तलवार – अंदाजे ₹४००
- स्टीलची तलवार – अंदाजे ₹२००
- लोखंडी कोयता – अंदाजे ₹१००
- लोखंडी सत्तुर – अंदाजे ₹२००
- लोखंडी सुरा – अंदाजे ₹१००
- लोखंडी पाते असलेली कु-हाड – अंदाजे ₹१००
एकूण अंदाजे ₹१,६०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीकडे या शस्त्रांसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्याने शस्त्र अधिनियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
जूनपासून ४ अग्निशस्त्रे अन् १२ हत्यारे जप्त
माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत जून २०२६ पासून आतापर्यंत ४ अग्निशस्त्रे आणि १२ हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. या कारवायांमध्ये एकूण ८ गुन्हे दाखल करून १३ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि बारामती उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, संजय मोहिते तसेच पोलीस अंमलदार अजय अवघडे, वैभव मोहोळकर, विजय वाघमोडे, महेश पठारे, ज्ञानेश्वर मोरे, राजू शिंदे, अमोल वाघमारे आणि सागर पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
माळेगाव पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण यांच्या वतीने बेकायदेशीर शस्त्रांवर सुरू असलेल्या कारवाईचा हा भाग असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.






