नीरा भीमा कारखान्याला राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार
नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान; कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

नीरा भीमा कारखान्याला राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार
नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान; कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
इंदापूर –
शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने राष्ट्रीय पातळीवर तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्ली यांच्या वतीने गाळप हंगाम २०२५-२६ साठी देण्यात येणारा राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार मंगळवारी (दि. २२) नवी दिल्ली येथे झालेल्या समारंभात प्रदान करण्यात आला.
केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत अध्यक्षा भाग्यश्री पाटील, उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे आणि संचालक मंडळाने हा पुरस्कार स्वीकारला.

राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार सोहळ्याचे प्रास्ताविक राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये कारखान्याने केलेल्या उल्लेखनीय तांत्रिक कामगिरीची दखल घेत महासंघाकडून हा राष्ट्रीय सन्मान देण्यात आला.
रौप्यमहोत्सवी गाळप हंगामातच देशपातळीवरील सर्वोच्च तांत्रिक सन्मान मिळाल्याने नीरा भीमा कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे, अशी भावना अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी व्यक्त केली.

या पुरस्काराबद्दल हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांनी संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी व वाहतूकदार, अधिकारी, कर्मचारी तसेच हितचिंतकांचे अभिनंदन केले. कारखान्याला आतापर्यंत या पुरस्कारासह राज्य व देशपातळीवरील एकूण १४ पुरस्कार मिळाले असल्याची माहितीही भाग्यश्री पाटील यांनी दिली.
विविध राज्यांतील मान्यवरांची उपस्थिती
पुरस्कार वितरण सोहळ्यास महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह गुजरात, पंजाब, हरियाणा, ओडिशासह विविध राज्यांतील सहकार मंत्री, देशभरातील साखर कारखान्यांचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक उपस्थित होते. पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण खात्याच्या सभापती अंकिता पाटील ठाकरे, राजवर्धन पाटील, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांच्यासह कारखान्याचे संचालक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.महासंघाचे उपाध्यक्ष केतनभाई पटेल यांनी आभार मानले.
‘नीरा भीमा’च्या कामगिरीवर राष्ट्रीय मोहोर
गाळप हंगाम २०२५-२६ मधील उत्कृष्ट तांत्रिक कामगिरीची राष्ट्रीय पातळीवर दखल घेत नीरा भीमा सहकारी साखर कारखान्यास प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. रौप्यमहोत्सवी गाळप हंगामात मिळालेला हा सन्मान कारखान्याच्या तांत्रिक कार्यक्षमतेसह शेतकरी, कामगार आणि प्रशासनाच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित मानले जात आहे.






