२८ पैकी २४ ठिकाणी विजय; बारामतीतील टी.सी. कॉलेजने ‘जल्लोष’मध्ये रचला विक्रम
कला, गुणवत्ता अन् मेहनतीचा संगम!

२८ पैकी २४ ठिकाणी विजय; बारामतीतील टी.सी. कॉलेजने ‘जल्लोष’मध्ये रचला विक्रम
कला, गुणवत्ता अन् मेहनतीचा संगम!
बारामती वार्तापत्र
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे विद्यार्थी विकास मंडळ आणि ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदाबाई पवार महिला महाविद्यालय, शारदानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय ‘जल्लोष–२०२६’ युवा महोत्सवात अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाने (टी.सी. कॉलेज) आपल्या कलागुणांचा पुन्हा एकदा ठसा उमटवत सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.
यंदाच्या महोत्सवात टी.सी. महाविद्यालयाने तब्बल २८ पैकी २४ कलाप्रकारांमध्ये विजेतेपद मिळवत १६६ गुणांची विक्रमी नोंद केली. सातत्यपूर्ण सराव, कलाविषयक गुणवत्ता, सांघिक भावना आणि विद्यार्थ्यांच्या अथक मेहनतीच्या जोरावर महाविद्यालयाने ‘जल्लोष’च्या विजेतेपदावर सलग तिसऱ्यांदा आपले नाव कोरले.
संगीतापासून ललित कलेपर्यंत विद्यार्थ्यांचा जलवा
‘जल्लोष–२०२६’मध्ये टी.सी. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य आणि ललित कला या पाचही प्रमुख विभागांत दमदार कामगिरी केली. विविध कलाप्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी सादरीकरणातून आपली प्रतिभा सिद्ध करत परीक्षकांची दाद मिळवली.
विशेष म्हणजे २८ पैकी २४ कलाप्रकारांतील विजेतेपद ही महाविद्यालयाच्या सांस्कृतिक क्षेत्रातील भक्कम तयारीची आणि विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीची पावती मानली जात आहे. १६६ गुणांची विक्रमी कामगिरी करत टी.सी. कॉलेजने यंदाच्या ‘जल्लोष’मध्ये आपले वर्चस्व अधोरेखित केले.
मार्गदर्शन आणि मेहनतीला यशाची सलामी
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. भीमराव तोरणे, प्रा. सोमनाथ कदम आणि प्रा. राजेंद्र कंडरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धेची तयारी, सराव आणि विविध कलाप्रकारांच्या सादरीकरणासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या मेहनतीला विद्यार्थ्यांच्या प्रतिभेची साथ मिळाल्याने टी.सी. कॉलेजने सलग तिसऱ्यांदा ‘जल्लोष’चा मानाचा करंडक आपल्या नावे केला.
मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण
पारितोषिक वितरण समारंभास विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालक डॉ. सविता कुलकर्णी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. संदिप पालवे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप तसेच प्राचार्य राजकुमार बा. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
या अभूतपूर्व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर), सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर), संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य, प्राचार्य डॉ. अविनाश जगताप, सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. भीमराव तोरणे, प्रा. सोमनाथ कदम, प्रा. राजेंद्र कंडरे आणि सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
सलग तिसरे विजेतेपद, २८ पैकी २४ कलाप्रकारांतील बाजी आणि १६६ गुणांची विक्रमी कामगिरी यामुळे ‘जल्लोष–२०२६’मध्ये टी.सी. कॉलेजने पुन्हा एकदा आपल्या सांस्कृतिक सामर्थ्याची छाप उमटवली आहे.






