क्राईम रिपोर्ट

बारामतीत ‘खंडणीगिरी’चा धक्कादायक प्रकार? के-मार्टसमोर ग्राहकांना अडवून दादागिरी; कारवाईची मागणी

“ग्राहक सुरक्षित नसतील तर व्यापारी व्यवहारांवर परिणाम होईल.

बारामतीत ‘खंडणीगिरी’चा धक्कादायक प्रकार? के-मार्टसमोर ग्राहकांना अडवून दादागिरी; कारवाईची मागणी

“ग्राहक सुरक्षित नसतील तर व्यापारी व्यवहारांवर परिणाम होईल.

बारामती वार्तापत्र 

बारामती शहरातील तांदूळवाडी रोड परिसरात असलेल्या के-मार्ट दुकानाबाहेर कथितपणे दोन दुचाकीस्वार तरुणांकडून ग्राहकांना अडवून खंडणीसदृश मागण्या केल्या जात आहे. या प्रकारामुळे व्यापारी व ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण दुकानाच्या पार्किंग परिसरात थांबून दुकानात येणाऱ्या ग्राहकांवर लक्ष ठेवतात. ग्राहक खरेदी करून बाहेर आल्यानंतर त्यांना अडवून तेलाचे डबे, साखर तसेच इतर किराणा साहित्य देण्याची मागणी केली जात आहे, काही वेळा ही मागणी दादागिरीच्या स्वरूपात होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, या ग्राहकांमध्ये परदेशातून आलेल्या काही व्यक्तींचाही समावेश आहे. त्यामुळे बारामतीसारख्या प्रगत शहराची प्रतिमा मलिन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. “परदेशी पाहुण्यांसमोर अशा घटना घडत असतील तर शहराची आणि देशाची प्रतिमा धुळीस मिळू शकते,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

या प्रकरणाचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दुकान मालकाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांची चौकशी करण्यापेक्षा संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करणे गरजेचे असल्याची भावना व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.

दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी, तसेच जर आरोपांमध्ये तथ्य आढळले तर संबंधितांवर खंडणी, दमदाटी व कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणल्याप्रकरणी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

“ग्राहक सुरक्षित नसतील तर व्यापारी व्यवहारांवर परिणाम होईल. पोलिसांनी केवळ चौकशी न करता ठोस कारवाई करून अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालावा,” अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D