बारामतीतील तांदूळवाडी-जळोची पाणी योजनेचा घोळ कायम; मजीप्राचे पत्र समोर
पाणी योजनेच्या हस्तांतरणावरून नवा वाद

बारामतीतील तांदूळवाडी-जळोची पाणी योजनेचा घोळ कायम; मजीप्राचे पत्र समोर
पाणी योजनेच्या हस्तांतरणावरून नवा वाद
बारामती वार्तापत्र
तांदूळवाडी-जळोची नळ पाणीपुरवठा योजना तसेच बारामती शहर पाणीपुरवठा योजना टप्पा क्रमांक १ नगरपरिषदेकडे हस्तांतरित झाल्याच्या चर्चेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकृत पत्रामुळे नवा ट्विस्ट मिळाला आहे. संबंधित योजना अद्याप बारामती नगरपरिषदेकडे रीतसर हस्तांतरित झालेली नसल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे योजना नगरपरिषदेकडे वर्ग झाल्याची चर्चा असतानाच प्रत्यक्ष प्रशासकीय हस्तांतरणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता अजय सिंह यांनी मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुणे यांना पाठविलेल्या पत्रात या दोन्ही पाणीपुरवठा योजनांचा उल्लेख करण्यात आला आहे. संबंधित योजनेच्या देखभाल-दुरुस्तीची कामे नगरपरिषदेमार्फत करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले असले, तरी योजना अद्याप नगरपरिषदेकडे रीतसर हस्तांतरित झालेली नसल्याने ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत चालविण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आल्याचे समोर आले आहे.
🔎 अधिकृत पत्रामुळे प्रशासकीय गोंधळ चव्हाट्यावर?
एकीकडे योजना नगरपरिषदेकडे वर्ग करण्याबाबत चर्चा होत असताना दुसरीकडे मजीप्राच्या पत्रातच ‘अद्याप रीतसर हस्तांतरित झालेली नाही’ असे नमूद असल्याने योजनेच्या हस्तांतरणाची नेमकी स्थिती काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
योजना अद्याप अधिकृतपणे हस्तांतरित झालेली नसेल, तर नगरपरिषदेकडून करण्यात येणाऱ्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांना नेमका प्रशासकीय आधार काय? तसेच त्यासाठी निधी कोणत्या तरतुदीतून वापरला जात आहे? याचा खुलासा होणे आवश्यक असल्याची चर्चा आहे.
📄 उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीचे इतिवृत्तही मागविले
या पत्रात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा संबंधित खात्याचे मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे त्या बैठकीत पाणीपुरवठा योजनांच्या हस्तांतरणाबाबत नेमका काय निर्णय झाला आणि त्यानंतर कोणती प्रशासकीय कार्यवाही करण्यात आली, याकडे आता लक्ष लागले आहे.
💧 गळती, तलाव आणि खर्चाचा हिशेब जनतेसमोर येणार का?
बारामती शहर पाणीपुरवठा योजना टप्पा क्रमांक १ संदर्भात यापूर्वी पाइपलाइन गळतीच्या तक्रारी समोर आल्या आहेत. गळतीची कारणे तांत्रिक असल्याचे सांगण्यात आले असून नागरिकांचा त्रास लक्षात घेऊन पाइपलाइन बदलण्याची कार्यवाही करण्यात आल्याचे मजीप्राकडून सांगण्यात आले आहे.
मात्र, साठवण तलावाची गळती, पाइपलाइन दुरुस्ती, देखभाल-दुरुस्ती आणि आतापर्यंत झालेला खर्च याचा संपूर्ण तपशील काय? याबाबत नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा योजनांच्या हस्तांतरणासोबतच निधी आणि कामांच्या हिशेबाबाबतही पारदर्शकता आवश्यक असल्याची मागणी पुढे येत आहे.






